Pune: शहरात कोरोनाचे सात नवे रुग्ण, पुणे जिल्ह्यात 254 रुग्ण तर मृतांचा आकडा 29 वर!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (शनिवारी) सात नवे रुग्ण सापडले असून तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 254 झाली असून कोरोना बळींचा आकडा 29 पर्यंत वाढला आहे. 

नवीन सात रुग्णांची भर पडल्याने पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 213 झाली आहे. पिंपरी-चिंचवडचे 29 व ग्रामीणचे 12 रुग्ण असे मिळून पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 254 झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. आज नवीन सापडलेल्या सातही रुग्णांवर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पुणे शहरात एकूण 26 जण कोरोनामुक्त

पुणे शहरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 26 झाली आहे. त्यापैकी 23 रुग्णांवर महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. नगर रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालय, भारती रुग्णालय व केईएम रुग्णालयातील प्रत्येकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या सर्व कोरोनामुक्त रुग्णांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

पुण्यात आतापर्यंत 2,078 रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यापैकी निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या 1,859 जणांना सोडण्यात आले. कोरोनाबाधित रुग्णांपैकी 26 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.  एकूण 185 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.. कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयातील एका कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे.
मृतांचा आकडा 29 वर
पुणे जिल्ह्यात एकूण 29 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 21 जणांचा ससून रुग्णालयात, नोबेल रुग्णालयात दोघांचा तर औंध जिल्हा रुग्णालय, डॉ. नायडू रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, इनामदार रुग्णालय, जहांगीर रुग्णालय व सह्याद्री रुग्णालय (कर्वे रस्ता) या ठिकाणी प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.
अजून 1,629 प्रवासी निरीक्षणाखाली
परदेशातून पुण्यात आलेल्या 3,627 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1998 प्रवाशांनी 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असून अजून 1,629 प्रवासी निरीक्षणाखाली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.