Pune New : औद्योगिक क्षेत्राला 20 टक्के ऑक्सिजनचा वापरण्यास मंजुरी : जिल्हाधिकारी

एमपीसीन्यूज : कोरोना रुग्णवाढीचा दर जिल्हयात कमी झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे. औद्योगिक क्षेत्राची ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेवून शासनाने 20  टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्राला वापरण्यास मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असताना 363 मॅट्रीक टन एवढ्या ऑक्सिजनची आवश्यकता लागत होती. आता कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्यामुळे 190 मॅट्रीक टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता लागत आहे. जिल्हयात दैनंदिन 355 मॅट्रीक टन ऑक्सिजन उत्पादन होत आहे.

तसेच पुणे विभागाबाहेरील ऑक्सिजनच्या मागणीतही घट झाली आहे. हवेतून ऑक्सिजन काढणाऱ्या विविध प्लॉन्टमधून 20 टक्के ऑक्सिजन मिळत आहे. त्यामुळे कोरोनच्या काळात औद्योगिक चक्र सुरु राहावे यासाठी 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्रासाठी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी पुर्ण क्षमतेने जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन निर्मिती करावी. उत्पादित केलेल्या एकुण ऑक्सिजनपैकी 80  टक्के वापर हा मेडीकल ऑक्सिजन वापरासाठी करण्यात येऊन त्याचा पुरवठा रुग्णालयाना करण्यात यावा. तसेच उर्वरीत ऑक्सिजनपैकी 20 टक्के वापर हा औद्योगिक प्रयोजनासाठी करण्यात यावा.

यामध्ये प्रथम प्राधान्य रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येऊन त्यानंतर औद्योगिक प्रयोजनासाठी पुरवठा करण्यात यावा. कोविड- 19  विषाणू प्रादुर्भावाचे अनुषंगाने आवश्यकता भासल्यास औद्योगिक प्रयोजनासाठी वळविण्यात आलेला 20 टक्के ऑक्सिजनचा वापर हा रुग्णालयासाठी पुरविण्यात येईल. औद्योगिक प्रयोजनासाठी 20 टक्के ऑक्सीजनचा वापर करण्याबाबत सुचना देण्यात आल्याची माहिती पुण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी दिली आहे.
*

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.