Pune : साहित्याच्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या दैनंदिनीला वाङ्मयीन मूल्य लाभावे – डॉ. रामचंद्र देखणे

एमपीसी न्यूज- दैनंदिनी म्हणजे केवळ दिनांक वार, वार, दिनविशेष यासाठी ठेवलेली पाने नसून अनेक दैनंदिनींमध्ये विविध विचारवंतांचे, लेखकांचे लेख प्रसिद्ध होतात. एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेली दैनंदिनी ही त्या विषयाची सखोल माहिती प्रकाशित करीत असल्याने दैनंदिनी हा साहित्याचाच एक प्रकार ठरू शकेल, यात शंका नाही. खरेतर साहित्याच्या विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या दैनंदिनीला वाङ्मयीन मूल्य लाभावे, अशी अपेक्षा संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.

राम न्यूज पेपर एजन्सीतर्फे श्री अक्कलकोट स्वामी देनंदिनी 2020 चे प्रकाशन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित वसंतराव गाडगीळ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. प्रमोद आडकर, शाहीर हेमंतराजे मावळे, संपादक राम दहाड, संस्थापक श्रीराम दहाड आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “नित्याच्या व्यवहारात वावरताना कोणतेही काम किंवा उपक्रम करण्यापूर्वी त्याच्यावर बारकाईने विचार करणे, हे महत्त्वाचे ठरते. पण त्याहीपेक्षा ते काम पूर्णत्वाला नेणे हे अधिक महत्त्वाचे असते. विचार आणि पूर्णत्व याच्यामध्ये त्या कामाची रचनात्मक आखणी आणि नियोजन हा भाग सर्वात महत्त्वाचा असून या नियोजनासाठी दैनंदिनी ही सर्वात उपयुक्त ठरते. म्हणूनच दैनंदिनी हा माणसाचा खरा मित्र आहे”

पंडित वसंतराव गाडगीळ म्हणाले की, दैनंदिनी प्रकाशित करणे म्हणजे ही साहित्याची अक्षरसेवा आहे. अशा वाङ्मयाला लोकमान्य टिळकांपासूनची परंपरा लाभलेली आहे. दैनंदिनीरुपी वाङ्मय हे त्रिकालाबाधीत सत्य असते. तसेच हे अक्षय्य वाङ्मय असते.

यावेळी अॅड. प्रमोद आडकर आणि शाहीर हेमंतराजे मावळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम दहाड यांनी केले. श्रीराम दहाड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.