Pune : काँक्रीट पर्यावरणपूरक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान फायदेशीर –प्रा. एम. एस. शेट्टी

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यपूर्व काळ ते आजपर्यंतचा काळ पाहिला तर काँक्रीट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. गेल्या काही दशकांपासून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटमध्ये तुलनेने अधिक पर्यावरणपूरक असलेल्या घटकांचा अंतर्भाव केला जात आहे. त्यामुळे काँक्रीटची गुणवत्ता सुधारून ते पर्यावरणपूरक होण्यास मदत होत आहे, असे मत ज्येष्ठ बांधकाम अभियंता व ‘कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीरिंग’चे माजी प्राध्यापक एम. एस. शेट्टी यांनी व्यक्त केले.

‘इंडिअन काँक्रीट इंस्टिट्यूट’ (आयसीआय)चा पुणे व मुंबई विभाग आणि इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या पुणे विभागाच्या वतीने प्रा. शेट्टी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त ‘काँक्रीटचे भविष्य’ (फ्युचर ऑफ काँक्रीट) या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. हॉटेल ‘शेरेटन ग्रँट’ येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘सीएमई’चे कमांडंट लेफ्टनंट जनरल मायकल मॅथ्युज यांच्या हस्ते प्रा. शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी इंडिअन काँक्रीट इंस्टिट्यूटच्या (आयसीआय) पुणे विभागाचे अध्यक्ष उज्ज्वल कुंटे, सचिव प्रसाद सेवेकरी,‘आयसीआय’चे माजी अध्यक्ष विवेक नाईक, इंडियन जीओटेक्निकल सोसायटीच्या पुणे विभागाचे माजी अध्यक्ष रमेश कुलकर्णी, ‘आयसीआय’ मुंबईचे सचिव विशाल ठोंबरे आदि उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात काँक्रीटचा टिकाऊपणा आणि दीर्घकालीनता वाढण्यासाठी विविध घटकांचा वापर, काँक्रीटचे टिकाऊपणाचे आयुष्य सांगू शकणारी प्रारुपे, काँक्रीटमधील थ्री-डी प्रिंटींग, पर्यावरणीय आणि आर्थिक परिणाम अशा विषयांवर तज्ञांकडून चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रा.शेट्टी म्हणाले, काँक्रीटमधील सिमेंट हा घटक पर्यावरणपूरक नसला तरी त्यास पर्यावरणपूरक बनवण्यासाठी त्यात फ्लाय अॅशसारखे इतर घटक मिसळले जातात. त्यामुळे सिमेंट अधिक पर्यावरणपूरक होऊन काँक्रीटची गुणवत्ता तुलनेने सुधारली आहे. पुणे–मुंबईचे जर उपग्रहावरून छायाचित्र घेतले तर १९४७ आणि आताच्या स्थितीत तुलना करता जो काही बदल जाणवतो तो काँक्रीटमुळे झालेला बदल आहे.

काँक्रीट हा माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक घटकाशी निगडीत घटक झाला आहे. काँक्रीटच्या वापरातील आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यात माझा खारीचा वाटा आहे, याचा मला आनंद आहे. पूर्वी काँक्रीट विषयावर भारतात एकही पुस्तक नव्हते. परदेशातील पुस्तकांवरून ज्ञान संपादन करावे लागेल. मला कामाच्या निमित्ताने देशभर फिरायला, शिकायला मिळाले आणि पुढे तेच विद्यार्थ्यांनाही शिकविले.

प्राध्यापक शेट्टी यांच्या विषयी बोलताना मॅथ्युज म्हणाले, शेट्टी हे अभियंत्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा अध्यापनाचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांनी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये अध्यापन करताना हजारो अभियंतांना काँक्रीट विषयावर नवा दृष्टीकोन दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.