Pune News : कॉम्रेड विलास सोनवणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – संपूर्ण आयुष्य परिवर्तनवादी चळवळीसाठी समर्पित केलेले, लढाऊ वृत्तीचे  ज्येष्ठ कार्यकर्ते, मार्क्सवादी विचारवंत  कॉम्रेड विलास सोनवणे (वय ६८) यांचे बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

कॉम्रेड सोनवणे यांना निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत रात्री उशिरा अखेरचा निरोप देण्यात आला.

कॉम्रेड सोनवणे हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील तामसवाडी गावचे. विद्यार्थी दशेपासूनाच त्यांचा चळवळीत सक्रिय सहभाग होता. एसएफआय संघटनेचे महाराष्ट्राचे ते संस्थापक सचिव होते. सर्व धर्मातील ओबीसींची संघटना उभी करण्याचे काम त्यांनी केले. मुस्लिम ओबीसी चळवळीचे ते संस्थापक होते. डाऊ आंदोलन, सेझ विरोधी लढा, सर्व धर्मीय-सर्व पंथीय सामाजिक परिषद याचे ते संस्थापक होते.

लढताना केलेल्या चिंतनातील बहुजन स्रीवाद, मुस्लिम प्रश्नाची गुंतागुंत ही त्यांनी लिहिलेली पुस्तके आहेत. विविध नियकालिकांमधूनही त्यांनी विपुल लेखन केले आहे.

 

कारकीर्द

१९७३ –  “स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया”च्या माध्यमातून मार्क्सवादी  कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश, “स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया”च्या महाराष्ट्र शाखेचे संस्थापक सचिव.

१९७३-७५ – “सिद्धार्थ कॉलेज” मुंबईच्या विद्यार्थी संघटनेचा पहिला कम्युनिस्ट विद्यार्थी सचिव.

१९७८ –  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामधून हकालपट्टी.

१९७८ – ‘कॉम्रेड शरद पाटील’ यांच्यासोबत “सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष” स्थापनेत सहभाग.

१९७९ – नक्षलवादी चळवळीत प्रवेश.

१९८१ – बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील आश्रमाने पारधी समाजाने बळकावलेल्या जमिनी सोडवण्यासाठी लढा.

महाराष्ट्रातील इतर असंख्य लढे-चळवळी-आंदोलनांमध्ये सहभाग आणि नेतृत्व.

१९९० – मुस्लीम मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेत पुढाकार.

१९९१ – वर्गेतर सामाजिक रचनांच्या मुद्द्यांवर नक्षलवादी चळवळीतून बाहेर.

१९९२ – अॅड. जनार्धन पाटील यांच्या सोबतीने मुस्लिम ओबीसी चळवळीची सुरवात.

१९९९ – देशातील मार्क्सवादी-लेनिनवादी, फुलेवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, जयप्रकाशवादी, लोहियावादी चळवळींतून थबकलेल्या कार्यकर्त्यांची संवादप्रक्रिया सुरु करण्यात पुढाकार.

२००१ – या संवादप्रक्रियेतून ‘युवा भारत’ या संघटनेची स्थापना.

२००५-२००८ – न्या. पी. बी. सावंत व न्या. बी. जी. कोळसे-पाटील, अॅड. दत्ता पाटील यांच्या सोबत रायगड येथील रिलायन्स सेझ प्रकल्प हटविण्याची यशस्वी लढा.

२००८ – वारकऱ्यांच्या सहकार्याने (ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वात) पुण्याजवळील डाऊ केमिकल्स कंपनीच्या विरोधात झालेल्या यशस्वी लढ्याचे जनक.

२००८ – रायगडच्या सेझ विरोधी लढ्याच्या आधाराने देशभरातील सर्व सेझ विरोधी लढ्यांच्या समन्वय समितीची स्थापना.

२०११ – महाराष्ट्रातील समतावादी धर्म व पंथाच्या सहभागाने बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली साम्राज्यवाद विरोधी सर्वधर्मीय व सर्व पंथीय सामाजिक परिषदेची स्थापना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.