Pune News : लॉकडाऊन काळात विजेचा वापर 50 टक्क्यांनी घटला

एमपीसी न्यूज – पुणे शहरात 2018-19 मध्ये व्यावसायिक विजेचा वापर 1324.53 दशलक्ष युनिट (मिलियन युनिट) इतका झाला होता. मात्र, लॉकडाऊन लागल्यानंतर 2019–20 या वर्षात 743.56 दशलक्ष युनिट (मिलियन युनिट) इतका झाला. या काळात विजेची मागणी तब्बल 50 टक्क्यांनी घटली आहे. याच कालावधीत सौरऊर्जेचा वापर दुपटीने वाढल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालातून समोर आले आहे.

पालिकेचा 2020-21 चा पर्यावरण अहवाल सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. पुण्यात विजेचा सर्वाधिक वापर हा घरगुती वापरासाठी होत असून, त्या खालोखाल व्यवसाय, उद्योग, महापालिकेचे प्रकल्प, शेती यासाठी होत आहे. कोरोनामुळे उद्योग-व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक संकट ओढवले होते. पण याच काळात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात घटला होता.

विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात बसून होते. बहुतांचे वर्क फ्रॉम होम सुरू झाले होते. तरीही वीजेचा वापर सुमारे 150 दशलक्ष युनिटने कमी झाला आहे. महापालिकेने गेल्या सहा वर्षांतील शहरातील एकूण वीज वापराची माहिती सादर केली. त्यात 2014-15 मध्ये 4 हजार 435 दशलक्ष युनिट, 2015-16 मध्ये 4 हजार 628 दशलक्ष युनिट, 2016-17 मध्ये 4 हजार 501 दशलक्ष युनिट, 2017-18 मध्ये 5 हजार 444 दशलक्ष युनिट 2018-19 मध्ये 5 हजार 601 दशलक्ष युनिटचा वापर करण्यात आला होता. तर2019-20 मध्ये 4 हजार 452 दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे.

2015-16 पेक्षाही 2019-20 मध्ये वीजेचा वापर कमी झाला

लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर कमी झाला असला तरी याचकाळात शहरात सौरऊर्जेचा वापर वाढला आहे. 2018-19 मध्ये 2 हजार 667सौरऊर्जा वापरणारे नागरिक होते. त्यांच्याकडून 1.53 कोटी युनिटची वीजनिर्मिती झाली होती. तर 2019-20मध्ये ही सौरऊर्जा वापरणाऱ्यांची संख्या वाढून 3 हजार 211 झाली,.या माध्यमातून 3 कोटी 2 लाख 90 हजार 387 युनिटची वीजनिर्मिती झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.