Pune news: बँक लुटणाऱ्या ‘त्या’ 5 दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांची 10 पथकं तैनात

एमपीसी न्यूज: पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात गुरुवारी पाच बंदूकधारी दरोडेखोरांनी भरदिवसा बँकेत प्रवेश करून तब्बल दोन कोटींचे सोने आणि रोख 30 लाख रुपये चोरून नेले होते. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेतील दरोडेखोरांना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून दहा पथकं तैनात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.

अभिनव देशमुख म्हणाले, पिंपरखेड गावातील बँक दरोड्याच्या घटनेचा तपास सुरु आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी दहा वेगवेगळी पथके तैनात केली आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी काही सीसीटीव्ही मध्ये दिसली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून देखील तपास सुरू आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पोलिसांना देखील या संदर्भात माहिती देण्यात आली असून त्या जिल्ह्यात देखील या आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच यातील आरोपींना अटक केले जाईल.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तोंड बांधलेल्या अवस्थेत पाच दरोडेखोर बँकेत शिरले. बंदुकीचा धाक दाखवून बँकेतील कर्मचाऱ्यांकडून लॉकरच्या चाव्या घेतल्या आणि काही मिनिटात सोनं आणि रोख रक्कम पोत्यात घालून पळून गेले होते. या संपूर्ण घटनेचा थरार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शिरूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.