Pune News : पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेची 100 दिवसाची योग कार्यशाळा यशस्वी

एमपीसी न्यूज – आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून 21 जून हा दिवस साजरा केला जातो. योग दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण, मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो (आरओबी) आणि पुण्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेने संयुक्तपणे ‘सामान्य योगाभ्यास नियम’ अंतर्गत थेट योगाभ्यास सत्रे घेण्यास सुरुवात केली. 13 मार्च 2021पासून दररोज सकाळी सात ते आठ या वेळेत युट्यूब वरून हा कार्यक्रम ऑनलाईन प्रसारित केला जात आहे.

100 दिवस चालणारी ही सत्रे आंतरराष्ट्रीय योगदिन पर्यंत ही सत्रे सुरु राहणार आहेत. ‘कल्याणासाठी योग’ अशी या योगाभ्यास सत्राची संकल्पना आहे. ‘सध्या कोविड महामारीच्या संकटकाळात ही संकल्पना अत्यंत चपखल आहे. तणाव, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी ही सत्रे अत्यंत प्रभावी स्वयं व्यवस्थापन शिकवणारी ठरली आहेत. कोविडच्या या आव्हानात्मक काळात लोकांचे कल्याण साधण्यासाठी या सत्रांचा मोठा लाभ झाला. या उपक्रमाचे उद्दिष्ट लोकांना योगाभ्यासाविषयक सर्वसामान्य नियमांची ओळख करुन देणे हेही होते’, असे राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक प्रा. के सत्यालक्ष्मी यांनी सांगितले.

आयुष मंत्रालयाने तयार केलेल्या सामान्य योगाभ्यास कार्यक्रमानुसार ही ऑनलाईन सत्रे तयार करण्यात आली आहे. ‘सामान्य योगाभ्यास’ म्हणजे 45 मिनिटांच्या एका सत्रात सर्वसामान्यांना करता येणारी दैनंदिन आसने आणि प्राणायामाचा निश्चित कार्यक्रम आहे. ही लाईव्ह योगसत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून घेतली गेली आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो च्या (महाराष्ट्र आणि गोवा) तसेच एनआयएन पुणे यांच्या सोशल मिडीया पेजेसवरुन ती थेट दाखवण्यात आली.

आरओबी तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले. “कोविड महामारीमुळे घालण्यात आलेली बंधने लक्षात घेता, हा उपक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश, लोकांना ऑनलाईन स्वरूपात योगाभ्यास प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हा होता. यंदा आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त केंद्र सरकारची संकल्पना, “योगासह रहा, घरीच रहा’ अशी असून हा उपक्रम त्या संकल्पनेशी सुसंगतचा ठरला, असेही त्यांनी सांगितले.

योगाभ्यासाची सर्व सत्रे खालील लिंकवर उपलब्ध आहेत.
https://www.youtube.com/c/MAHAROB/videos

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.