Pune News : उत्पन्नवाढीसाठी 11 टक्के मिळकतकर वाढीचा प्रस्ताव ; पुणेकरांवर आर्थिक बोजा

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थिक टंचाईतून मार्ग काढण्यासाठी पुणेकरांवर आर्थिक बोजा चढणार आहे. कारण महापालिकेकडून आगामी 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी 11 टक्के मिळकतकर वाढीचा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायीपुढे ठेवला आहे.

या माध्यमातून महापलिकेच्या उत्पन्नात 130 कोटींची वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. परंतु, स्थायी समितीने हा प्रस्ताव खास सभेसाठी पाठवला आहे. त्यामुळे मिळकत करात वाढ होणार की नाही, याचा अंतिम निर्णय खास सभेतच घेतला जाणार आहे. त्याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागून राहीले आहे.

अशी असणार प्रस्तावित मिळकतकर वाढ 

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सर्वसाधारण करामध्ये 5.5 टक्के, सफाई करामध्ये 3.5 टक्के आणि जलनि:सारण करामध्ये 2 टक्के दरवाढीचा प्रस्ताव सुचवला आहे. यामुळे महापालिकेला मिळकत करामधून 2 हजार 164 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

नेमकी सवलत कोणाकोणाला असणार ?

1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 अखेर संपुर्ण मिळकतकराची रक्कम भरणार्‍या मिळकतधारकांना करामध्ये देण्यात येणारी 5 टक्के अथवा 10 टक्के सवलत कायम ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गांडूळखत, खत प्रकल्प, सोलर प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजनांसाठी देण्यात येणारी सवलत कायम राहणार आहे.

त्याचबरोबर वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पत्नी किंवा माता यांना करात देण्यात येणारी सवलत कायम राहणार आहे. राष्ट्रपतीपदक देण्यात आलेल्या स्वत: राहत असलेल्या एका मिळकतीला सामान्य करात सुट देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.