Pune News: जम्बो हॉस्पिटलमध्ये 23 रुग्णांनी साधला नातेवाईकांशी संवाद

रुग्णांना पाचवेळा जेवण रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी मागील आठवड्याभरात आल्या. त्यामुळे महापालिकेने आता जम्बो रुग्णालयामध्ये दिवसामधून पाच वेळा जेवण देण्यास सुरुवात केली आहे.

एमपीसी न्यूज – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘जम्बो कोविड सेंटर’मधून बुधवारी दिवसभरात 23 रुग्णांनी व्हिडिओ कॉलिंग सुविधेद्वारे आपल्या नातेवाईकांसोबत संवाद साधला. दिवसभरात 20 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

जम्बो कोविड सेंटरमध्ये पुणे महापालिकेतर्फे अनेक सुधारणा केल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केलेले जम्बो हॉस्पिटल सातत्याने वादग्रस्त ठरत होते. नेमण्यात आलेल्या मेडिब्रो एजन्सीद्वारे मागील काही दिवसांपासून काम सुरु आहे.

महापालिकेनेही त्यांच्याकडील मनुष्यबळ याठिकाणी तैनात केले आहे. यासोबतच देखरेखीसाठी आणि कामकाजातील सुधारणेसाठी सहा अधिका-यांची समन्वय समितीही गठीत करण्यात आली आहे.

रुग्णांना दिवसातून पाच वेळा जेवण दिले जात असून नातेवाईकांना रुग्णांची माहिती मिळावी याकरिता मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यासोबतच रुग्णांना थेट नातेवाईकांशी बोलता यावे व त्यांची सध्यस्थिती कळावी याकरिता व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

बुधवारी दिवसभरात व्हिडिओ कॉलिंगद्वारे 23 रुग्णांनी आपल्या नातेवाईकांशी संवाद साधला. उपचार घेऊन बरे झालेल्या 20 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

याठिकाणी पालिका आणि मेडिकल एजन्सीचे एकत्रित 60 डॉक्टर आणि 150 वैद्यकीय कर्मचारी काम करीत आहेत. 24 तास डॉक्टरांच्या टीम कार्यरत असून रुग्णांना कसलाही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल म्हणाल्या.

रुग्णांना पाचवेळा जेवण रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी मागील आठवड्याभरात आल्या. त्यामुळे महापालिकेने आता जम्बो रुग्णालयामध्ये दिवसामधून पाच वेळा जेवण देण्यास सुरुवात केली आहे. हे जेवण दर्जेदार असावे, त्यामधून पोषणतत्व मिळावीत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

जम्बो हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर नेमण्यात आलेले बाऊन्सर हटविण्यात आले आहेत. पुणे महापालिकेचे सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.