Pune News : नदीसुधार जायका प्रकल्प उभारणीतील दिरंगाईमुळे 250 कोटींचा फटका !

एमपीसी न्यूज : मुळा-मुठा नद्यांचे संवर्धन करण्यासाठी ‘द जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी’ (जायका) जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. परंतु, 2014-15 मध्ये मंजुरी मिळुनही प्रकल्प उभारणीत दिरंगाईमुळे पुणे महापालिकेला अंदाजे 250 कोटींचा फटका बसला आहे.

दरम्यान, जायकाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मुठा- मुठा नदी संवर्धन योजनेच्या निविदांचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठीच्या अंदाजित प्रकल्प खर्चास महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीत गुरूवारी मान्यता देण्यात आली.

त्यानुसार, या योजनेसाठी आता 1236 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. त्यात एसटीपी तसेच इतर बांधकामांचा खर्च 1020 कोटींचा असून या प्रकल्पाच्या 15 वर्षे देखभाल दुरूस्तीचा खर्च सुमारे 216 कोटी रूपयांचा असणार असल्याची प्राथमिक आहे.

त्यामुळे या प्रकल्पाच्या सुधारीत निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जूनपासून या योजनेचे काम सुरू होण्याची शक्‍यता आहे.

केंद्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 990 कोटींचा खर्च अपेक्षित होता. त्यानुसार, केंद्राने या प्रकल्पास 2014-15 मध्ये मान्यता दिली होती. तर हा प्रकल्प 2021-22 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, केंद्राने मान्यता दिल्यानंतरही जवळपास तीन वर्षे या योजनेसाठी केंद्राकडून सल्लागारच नेमण्यात आलेला नव्हता.

तर सल्लागार नेमण्यात आल्यानंतर काढण्यात आलेल्या तीन कामांच्या निविदा जवळपास दुप्पट दराने आल्या त्यामुळे या निविदा महापालिकेने रद्द केल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने एकाच प्रकल्पासाठी वेगवेगळया निविदा न काढता एक शहर एक काम अशा निविदा काढण्याच्या सूचना केंद्राने
दिल्या होत्या.

तसेच या योजनेच्या प्रकल्प खर्चास आधी महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीने मान्यता द्यावी तसेच आधी प्रकल्पासाठीच्या सर्व आवश्‍यक जागांचे 100 टक्के भूसंपादन करावे, असे आदेश दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने सुधारीत प्रकल्पाचा अंदाजित खर्च एस्टीमेट कमिटी समोर ठेवला होता. तो 1500 कोटींपेक्षा अधिक होता.

त्यानंतर महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीने अनावश्‍यक खर्चाला कात्री लावत अखेर 1236 कोटींच्या खर्चास मान्यता दिली असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी स्पष्ट केले. त्यात 11 एसटीपी उभारणी तसेच इतर बांधकामाच्या खर्चासाठी 1020 कोटी खर्च होणार आहे. तर प्रकल्प चालविणे आणि त्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च पुढील 15 वर्षांसाठी 216 कोटी असणार आहे.

महापालिका प्रशासनाकडून सुधारीत अंदाज प्रस्तावित करताना, जायकाने प्रतीवर्षी प्रकल्प खर्चाची वाढ 4.21 टक्के गृहीत धरण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार, प्रशासनाने ही वाढ गृहीत धरून सांडपाणी शुध्दीकरण केंद्राचा खर्च प्रस्तावित केला आहे. त्यानुसार पूर्वीच्या निविदांमध्ये हा खर्च 764 कोटींचा होता तो वाढून 1020 कोटी झाला असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.