Pune News : खासगी संस्था, कंपन्या आणि बँकांच्या मदतीने 3 ऑक्सिजन प्लान्ट सुरु

एमपीसी न्यूज – शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने खासगी संस्था, कंपन्या, बँका आदींच्या मदतीने ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 प्लान्ट उभे केले असून यातून 3 हजार लिटर प्रति मिनिट अशी ऑक्सिजन निर्मिती होत आहे.

महापालिकेच्या लायगुडे रुग्णालयामध्ये 300 लिटर प्रतिमिनीट (एलपीएम) व 260 एलपीएम प्लान्ट आणि दळवी रुग्णालयातील 850 एलपीएमचे दोन प्लान्टमधून 1700 एलपीएम ऑक्सिजन रुग्णांना पुरवण्यास सुरुवात झाली आहे.

शहरात एकूणच रुग्णसंख्येच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे परराज्यातून आयात करण्यास सुरुवात झाली. मात्र तो देखील अपुरा पडू लागला. त्यामुळे महापालिकेला स्वतःच्या रुग्णालयात तरी ऑक्सिजन प्लान्ट असावेत अशी आवश्यकता भासू लागली. त्यामुळे काही संस्थांच्या मदतीने हे प्लान्ट उभारण्यात येत आहे. यासाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारला आहे. तर काही ठिकाणी पालिकेने खर्च केला.

पालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखाना, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि बाणेर जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात प्लान्ट उभारले आहेत. यात लायगुडे, दळवी आणि नायडूमधील प्लान्ट सुरू झाले आहेत. तर, बाणेर येथील प्लान्टचे काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच खेडेकर, बाणेर, वारजे, नायडू आणि इंदिरानगर येथील रुग्णालयांत 6 प्रकल्प प्रस्तावित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.