Pune News : उत्पन्नवाढीसाठी 34 एकर अ‍ॅमिनिटी स्पेसची होणार विक्री ?

लिलावाद्वारे 117 ठिकाणच्या मोकळ्या जागा विक्रीला, विधी विभागाकडून अभिप्राय मागविला

एमपीसी न्यूज : आर्थिक टंचाई दूर करणे आणि पालिकेच्या उत्पन्नवाढीच्या नावाखाली पुणे महापालिकेने त्यांच्या ताब्यातील सुमारे 34 एकर मोकळ्या जागांच्या (अ‍ॅमिनिटी स्पेस) विक्रीची तयारी सुरु केली आहे. 117 ठिकाणच्या जागा विकण्यात येणार आहेत.

या संदर्भातील प्रस्ताव महापालिका प्रशासन तयार करत असून विधी विभागाचा अभिप्राय मागवण्यात आला आहे. त्यानंतर लिलावाद्वारे या मोकळ्या जागांची विक्री केली जाणार आहे.

महापालिकेकडे उत्पन्न वाढीचे स्रोत कमी आहेत. थकित मिळकतकरांची 100 टक्के वसुली न होणे, जीएसटीचा राज्याकडील परतावा, मुद्रांक शुल्काचा परतावा न होणे, मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांवरील वाढता कोट्यवधींचा खर्च, वेतन, आस्थापना, देखभाल-दुरूस्तीवरील भरमसाठ खर्चाचा वाढता बोजा अशा विविध कारणांमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. या आर्थिक डबघाईवरील रामबाण उपाय म्हणून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या मोक्याच्या ठिकाणांवरील सुमारे 34 एकर मोकळ्या जागा (ॲमेनिटी स्पेस) विकण्याची नामुष्की ओढावली आहे.

महापालिकेच्या ताब्यातील 161 जागांपैकी 117 जागा विकण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासन तयार करत आहे. याविषयीचे धोरण ठरवण्यासाठी हा प्रस्ताव शहर अभियंता कार्यालयाकडे पाठविला असून, यावर महापालिकेच्या विधी विभागाचाही अभिप्राय घेण्यात येणार आहे.

याविषयीच्या धोरण निश्चित झाल्यानंतर आणि आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या जागांची लिलाव पद्धतीने विक्री करण्यात येणार असून, या दराची बोली ही सव्वाशे टक्क्यांनी जास्त ठेवण्यात येणार आहे.

पुणे शहरात उपनगरांसह सुमारे 21 भागांमध्ये या मोकळ्या जागा असून, विक्रीला काढलेल्या जागांचे मिळून एकूण क्षेत्रफळ सुमारे 34 एकर इतके आहे. महापालिका या जागा विकणार असल्या तरी त्याठिकाणी विकसनासंबंधीचे नियम मात्र महापालिकाच ठरवणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

खालील उद्दिष्ठांसाठी (पर्पज) विकसक मोकळ्या जागा वापरू शकणार आहेत. त्यामध्ये खेळांची मैदाने, व्यायामशाळा, स्टेडियम, उद्याने, शाळा, प्राथमिक शाळा, रुग्णालये, डिस्पेन्सरी, फायर ब्रिगेड स्टेशन, पोलीस ठाणे, इलेक्ट्रिक सब स्टेशन, पार्किंग आदींसाठीच या जागा विकसकाला वापरता येणार आहेत. मात्र याविषयीचे धोरण ठरवण्यात येणार असून, त्यामध्ये विकसकाला अटी घालाव्यात की नाही, याविषयीही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.