Pune News : मृत कोविडयोद्धयांची 38 कुटुंबे अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत !

_MPC_DIR_MPU_IV

एमपीसी न्यूज : गेल्या आठ महिन्यांत कोरोनामुळे पुणे महापालिकेतील 38 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण या कमेचाऱ्यांची 38 कुटुंबे अजूनही आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. घोषणेनंतरही महापालिका प्रशासनाकडून आजपर्यंत एकाही कविडयोद्धा कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिलेली नाही.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु, अद्यापही आम्हाला जाहीर केलेली मदत अजूनही मिळाली नाही, अशा संतप्त शब्दात कोरोना प्रतिबंधाचे काम करताना मृत्युमुखी पडलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्‍त होत आहे.

पालिकेने कोरोना नियंत्रणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मृत्यूमखी पडल्यास त्यांच्या वारसांना 1 कोटी रुपये मदत देण्याची घोषणा केली. त्यात, 50 लाख पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विमा, 25 लाख महापालिका तसेच 25 लाख राज्य शासनाची मदत अशी ही मदत होती.

या गेल्या आठ महिन्यांत 38 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात 34 कायम स्वरुपी तर 2 कंत्राटी कामगारांचा समावेश होता. या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पालिकेने केंद्राने नेमलेल्या विमा कंपनीस प्रस्ताव पाठविला. मात्र, हे कर्मचारी थेट कोरोना रुग्णाच्या उपचाराचे काम करत नव्हते असे सांगत विमा कंपनीने ही मदत नाकारली.

त्यानंतर पालिकेने केंद्र तसेच राज्य शासनाला मदतीचे साकडे घातले. मात्र, कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पालिकेने केंद्र व राज्याच्या मदतीची वाट न पाहता किमान आपली तरी 25 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला.

मात्र, त्यानंतर तीन महिने झाले तरी अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. 38 मधील 15 जणांच्या मदतीचे धनादेश काढण्यास दोन आठवड्यापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, त्यानंतर अद्यापही धनादेश काढलेले नाहीत.

एका बाजूला मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे वारस मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच पालिकेला मदत वाटपाचा जाहीर कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याचे श्रेय काही राजकीय नेत्यांना हवे असल्याने ही मदत देण्यासाठी पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपण्याची वाट पाहिली जात आहे.

मयत कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल न करता तातडीने मदत द्यावी, अशी विनवणी पीडित कुटुंबिय करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.