Pune News : अखेर कोविशिल्ड लसीचे 4 कंटेनर लोहगाव विमानतळावरुन रवाना !

एमपीसी न्यूज : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोविशिल्ड या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लसीचे चार कंटेनर आज देशांतर्गत वापरासाठी कंपनीतून पहाटे 4 वाजून 50 मिनीटांनी लोहगाव विमानतळाकडे रवाना झाले. पुढे विविध राज्यांमध्ये लसीकरणासाठी हा साठा वापरला जाणार आहे.

दरम्यान, कंपनीच्या मांजरी येथील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंटेनरची पूजा केल्यानंतर या कोल्ड चेन व्हॅन लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्या. यावेळी मांजरी ते लोहगाव दरम्यान वाहतुक सुरक्षिततेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

कोरोना विषाणुवर मात करु शकणारी बहुप्रतिक्षित कोव्हिशिल्ड या लसीची जगभरातील नागरिक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. ही आतुरता अखेर संपली आहे. कारण आजपासून ʻसिरमʼ कंपनीने ही लस देशांतर्गत नागरिकांना वापरासाठी उपलब्ध करून दिली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणात प्रामुख्याने कोरोना वॉरियर्स म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे.

या संदर्भात सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे म्हणाल, सीरम कंपनीला सुरुवातीला, सीरम कंपनीला 2 कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. त्यापैकी 65 लाख डोस आज देशभरातील विविध राज्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

पुणे विमानतळावरून कोविशील्ड लसीचे देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा, हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या भागात जाणार आहे.

पुणे विमानतळावरुन पहिले विमान दिल्लीसाठी सकाळी 8 वाजता रवाना झाले. 8 फ्लाईटपैकी 2 फ्लाईट कारगो असून यातील कारगो फ्लाईट पैकी एक हैदराबाद, विजयवाडा आणि भुवनेश्वर, तर दुसरी कोलकता आणि गोवाहाटी येथे जाणार आहे.

लस वाहतुकीसाठी औद्योगिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या विशेष प्रकारच्या ‘कोल्ड चेन व्हॅन’ वापरण्यात येत आहे. कोव्हिशिल्ड लस किमान 2 ते 8 अंश सेल्सियस इतक्या तापमानात ठेवणे आवश्यक असल्याने या व्हॅनमधून तितके तापमान नियंत्रित करण्यात आले आहे. कंपनीच्या स्वत:च्या आणि भाडे तत्वावरील व्हॅन लस वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये विमानांद्वारे या लसीची वाहतुक करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.