Pune News: महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी 400 कार्यालयीन सहाय्यकांची होणार निवड; स्थायी समितीची मान्यता

कर आकारणी आणि कर संकलन विभागासाठी अनुभवी लिपिक टंकलेखक संवर्गात 200 जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून तीन महिन्याकरिता नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला देण्यात आला होता.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी 400 कार्यालयीन सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याला मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या कर आकारणी आणि कर संकलन विभागात मनुष्यबळाची कमतरता पडू नये व अधिकाधिक मिळकत कर जमा होण्यासाठी या कर्मचाऱ्यांची मदत होणार आहे. सहा महिन्यांकरिता सप्टेंबर 2020 पासून 400 जणांची निवड करण्यात येणार आहे.

पुणे पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून 200 सेवकांची एकवट वेतनावर तीन महिने मुदतीकरिता नेमणुका करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. कर आकारणी आणि कर संकलन विभागासाठी अनुभवी लिपिक टंकलेखक संवर्गात 200 जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून तीन महिन्याकरिता नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीला देण्यात आला होता.

स्थायी समितीने उपसूचना देऊन ही मुदत सहा महिन्यांकरिता केली. 200 ऐवजी 400 जणांची कार्यालयीन सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नियुक्त उमेदवारांना किमान वेतन कायद्यानुसार महिन्याला सुमारे एकवट मानधन म्हणून 19 हजार 250 रूपये वेतन दिले जाणार आहे.

या नव्या 200 नियुक्तीमुळे महिन्याला 38 लाख 50 हजार रूपये अतिरिक्त बोजा येणार होता. स्थायी समितीच्या उपसूचनेनुसार आता दुप्पटीवर खर्च जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.