Pune News : येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात 41 लाख निधी

एमपीसी न्यूज – येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी, 41 लाख 77 हजार 598 रुपयांच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. याचबरोबर दळवी रुग्णालयामधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या बॅकअपसाठी 200 केव्हीए क्षमतेचे डिझेल जनरेटर पुरविण्यासाठी 11 लाख 80 हजार रुपयांच्या निविदेस स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली़ नायडू रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करून नेण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे़ दरम्यान, नायडू रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी, यापूर्वीच महापौर निधीतून 1 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

त्यामुळे या तरतुदीनुसार वीस दिवसांत हा प्रकल्प उभारण्यासाठी 01 कोटी 68 लाख रुपयांच्या प्रस्तावाला आज मान्यता दिली.

या निर्णयाबरोबरच माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, संरक्षण दलांमधील शौर्यपदक धारकांना त्यांच्या मालकीच्या निवासी मालमत्तेच्या मालमत्ता करातून राज्य शासनाच्या आदेशाच्या दिनांकापासून सवलत देण्यास मान्यता दिली. मात्र, मुख्य सभेची मान्यता मिळाल्यानंतर, या निर्णयावर कार्यवाही केली जाणार असल्याचेही रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.