Pune News : बिर्ला रुग्णालयात 5.5 वर्षीय मुलाच्या बुबुळावरील उच्च जोखीमीची शस्त्रक्रिया यशस्वी

एमपीसी न्यूज – साडेपाच वर्षांच्या मुलाच्या बुबुळावरील उच्च जोखीमीची शस्त्रक्रिया आदीत्य बिर्ला रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. या मुलाला रुट कॅनालनंतर होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुट कॅनाल केल्यानंतर त्याच्या त्वचेवर रक्ताचे डाग दिसत होते, विष्ठा डांबरासारखी होती आणि उलटीमधून रक्त पडत होते, तसेच खूप तापही येत होता.

‘मुलाला दाखल केल्यावर आम्हाला आढळले की, त्या मुलामध्ये डीआयसीसह (डिसेमिनेटेड इंट्राव्हॅस्क्युलर कोग्युलेशन) डिरेंज्ड कोग्युलोपथी आहे. या आजारामध्ये रक्त साकळवण्याची क्षमता कमकुवत होते. ही घातक परिस्थिती असते. यात मेंदू, आतडे, फुफ्फुसे इत्यादी महत्त्वाच्या अवयवांमध्ये खूप रक्तस्त्राव होतो. परिणामी, रुग्णाचा अचानक मृत्यू होऊ शकतो. त्याच्या रोगनिदानाची निश्चिती करण्यासाठी रक्ताची तपासणी करण्यासाठी आणि रक्तात एखाद्या बाह्यघटकाचा अंतर्भाव झाला आहे का, हे तपासण्यासाठी रक्त पाठवून दिले आणि मुलाच्या शरीरात होणाऱ्या रक्तस्त्रावाला नियंत्रणात आणण्यासाठी आयव्ही फ्लुइड्स, अँटिबायोटिक्स आणि स्थानिक पातळीवर उपाय करण्यास सुरुवात केली.’ असे एबीएमएचचे पीडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट डॉ. विपुल गांधी यांनी सांगितले.

सुरुवातीच्या तपासण्यांमधून डिरेंज्ड कॉग्युलेशन असल्याचे आढळले आणि पांढऱ्या पेशींची संख्या वाढलेली पाहून रक्ताचा कर्करोग म्हणजेच ल्युकेमिया झाला असावा असा संशय होता. रक्ताची, रक्तस्त्रावाची सखोल चाचणी केल्यानंतर हेमॅटोलॉजिस्ट्सना अनेक असाधारण प्रोमायलोसाइट्स आढळून आले. हे निष्कर्ष गंभीर स्वरुपाच्या प्रो-मायलोसायटिक ल्युकेमिया (एपीएमएल) या रक्ताच्या कर्करोगाकडे निर्देश करत होते, जो एक अत्यंत दुर्मीळ प्रकारचा रक्ताचा कर्करोग आहे. एपीएमएलवर उपचार करून तो हाताळणे एके काळी अत्यंत कठीण समजले जात असते. सध्या नव्या केमोथेरपी एजंट्सनी हा रोग पूर्ण बरा करण्याचे प्रमाण 95% आहे.

तत्काळ पीडियाट्रिक हेमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संदीप बारटक्के यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि एपीएमएल प्रोटोकॉलनुसार त्याला केमोथेरपी देण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या काही दिवसांमध्ये मुलाचे पीआयसीयूमधील वास्तव्य खूपच दगदगीचे होते. कारण दाताच्या पोकळीमधून सतत म्युकोक्युटेनिअस (श्लेष्मयुक्त) रक्तस्त्राव होत होता. हिरड्या, तोंडातील श्लेष्मिका आणि श्लेष्मला, दोन्ही बाजूच्या डोळ्यांच्या खाली रक्तस्त्राव होत होता, रक्ताच्या उलट्या होत होत्या आणि विष्ठेतूनही रक्त बाहेर पडत होते. घातक रक्तस्त्राव असलेल्या डीआयसीला नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्या दोन आठवड्यांमध्ये त्याला अनेकदा लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, कोग्युलेशन घटक चढवावे लागले आणि प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन करावे लागले.

तसेच त्यावर उपचार करण्यासाठी पहिल्या दोन आठवड्यांमध्ये त्याची तब्बल दोन डझन (27) ट्रान्सफ्युजन करण्यात आली, असे एबीएमएचमधील पीडियाट्रिक इन्टेसिव्हिस्ट डॉ. विपुल गांधी म्हणाले.

मुलाला रुग्णालयात दाखल केल्याच्या सहाव्या दिवशी त्याला अचानक काहीही दिसेनासे झाले आणि सेंट्रल स्कॉटोमा (असा ब्लाइंड स्पॉट जो दृष्टीमध्ये अडथळा निर्माण करतो) उद्भवला. यासाठी डॉ. ब्लेसी जेकब यांनी त्याची नेत्रतपासणी केली. या तपासणीमध्ये बायलॅटरल सबकंजंक्टिव्हायटल हॅमोरेज (ट्रॉमा किंवा मायक्रोव्हॅस्क्युलर आजारानंतर उद्भवणारा सौम्य स्वरुपाचा विकार) झाल्याचे आढळून आले. त्यासोबत डोळ्याच्या आतील भागात आणि रेटिनामध्ये रक्तस्त्राव झाल होता आणि रेटिना विलग होण्याची (फ्लुइड जमा झाल्यामुळे रेटिना विलग होऊ शकतो) शक्यता निर्माण झाली होती. कवटीच्या आत रक्तस्त्राव झालेला आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी सीटी ब्रेन चाचणी करण्यात आली. सीटीमध्ये दिसून आले की, कॉर्पस कॅलोसममध्ये (मेंदूच्या दोन गोलार्धांमधील मध्यवर्ती बिजागरीसारखा भाग) लहान आकाराचा 5-6 मिमी पर्यंत रक्तस्त्राव दिसून आला.

व्हिट्रिओ-रेटिनल सर्जन डॉ. निलेश गिरी यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी बी-स्कॅन चाचणी केली आणि पुन्हा एकदा फंडोस्कोपी केली आणि मुलाच्या पूर्ण डोळ्याचे जेल (व्हिट्रिअल रक्तस्त्राव) तसेच रेटिनामध्ये (डोळ्याचे पटल) सतत रक्तस्त्राव होत आहे. त्यामुळे मुलाच्या दोन्ही डोळ्यांमध्ये ट्रॅक्शनल डिटॅचमेंट (रेटिना) झाली आणि त्यामुळे अंधत्व आले.

या किचकट परिस्थितीमुळे आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्यामुळे आधी त्याच्या रक्तस्त्रावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पारंपरिक उपचार करण्यात आले. जेव्हा मुलाला चार आठवडे केमोथेरपी देण्यात आली तेव्हा त्याच्या क्लथनविकारात (रक्त न साकळणे) सुधारणा होऊ लागली. या कालावधीत पारंपरिक व्यवस्थापन आणि निरीक्षण करूनही प्रकाशाची जाणीव आणि अंधुक दृष्टीमध्ये मात्र नगण्य सुधारणा झाली. त्यामुळे आम्ही अॅक्टिव्ह इंटरव्हेन्शनचा निर्णय घेतला. मुलगा दाखल झाल्याच्या 36 व्या दिवशी आम्ही अत्यंत गुंतागुंतीची उच्च जोखीम असलेली बायलॅटरल पार्सप्लाना व्हिट्रेक्टॉमी आणि एंडोलेझर उपचार केले त्याचप्रमाणे गॅस टॅम्पोनेड (ऑक्टोफ्लरोप्रोपेन सी3एफ8) उपचार केले, जेणेकरून फ्लुइडला रेटिनल ब्रेकमधून सबरेटिनल भागात जाण्यापासून रोखता यावे. ही शस्त्रक्रिया भूल देऊन करण्यात आली. पोस्टिरिअर रेटिनल डिटॅचमेंट रोखण्यासाठी गॅसचे संपीडन (विलग झालेल्या बुबुळाच्या पडद्यापासून म्हणजेच रेटिनापासून लाइट गॅसचे प्रेशर राखण्यासाठी) राखण्यासाठी मुलाला 24 तासांसाठी खाली डोके व वर पाय अशा स्थितीत ठेवण्यात आले. शस्त्रकयेननंतरंतर मुलाच्या दृष्टीमध्ये 70-80% सुधारणा झाली आणि सध्या मुलाला रंग आणि आकार यांची जाणीव होत आहे आणि मध्य दृष्टीने (सेंट्रल व्हिजन) मोठी अक्षरे वाचू शकत आहे”, असे या मुलावर ही महत्त्वाची नेत्र शस्त्रक्रिया केलेल्या डॉ. निलेश गिरी यांनी सांगितले.

सध्या मुलाला केमोथेरपीची दुसरी सायकल डे-केअर पद्धतीने देण्यात येत आहे, जी पुढील 8 महिन्यांसाठी नियोजित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.