Pune News : 50 खाटांच्या कोविड रुग्णालयाला अवघ्या सात तासांत वीजजोडणी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या वतीने वानवडी येथे उभारण्यात येणाऱ्या 50 खाटांच्या प्रस्तावित कोविड रुग्णालयाला अवघ्या सात तासांमध्ये महावितरणकडून थ्री फेजची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोनाच्या कालावधीत पुणे परिमंडलात आतापर्यंत 5 कोविड रुग्णालयांना मागणीनुसार 24 ते 48 तासांमध्ये नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

कोविडशी संबंधीत रुग्णालये, ऑक्सीजन प्रकल्प, लसीकरण केंद्र आदींना मागेल तेव्हा नवीन वीजजोडणी तसेच वाढीव वीजभार तात्काळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहे. राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत पूर्वीच आदेश दिले असून त्याची चोख अंमलबजावणी महावितरणकडून सुरु आहे.

पुणे महानगरपालिकेकडून वानवडीमधील विशाल मेगा मार्टच्या जागेत 50 ऑक्सीजन खाटांच्या कोविड रुग्णालयाची उभारणी वेगाने सुरु आहे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून रास्तापेठ विभागाच्या सेंट मेरी उपविभाग कार्यालयात मंगळवारी (दि. 4) थ्रीफेज 30 किलोवॅट क्षमतेच्या नवीन वीजजोडणीचा अर्ज प्राप्त झाला. लगेचच स्थळपाहणी केल्यानंतर ताबडतोब वीजजोडणीचे कोटेशन देण्यात आले.

पुणे महानगरपालिकेने देखील त्वरीत प्रतिसाद देत दुपारी साडेचार वाजता कोटेशनचा भरणा केला. त्यानंतर महावितरणकडून तातडीने केबल व वीजमीटर बसविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली व त्याचदिवशी रात्री सात वाजता नवीन वीजजोडणीद्वारे प्रस्तावित कोविड रुग्णालयासाठी वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.