Pune News : पाच महिन्यांमध्ये 6 लाख वीजग्राहकांनी स्वतःहून पाठविले मीटरचे फोटो रिडींग

वीजमीटरचे रिडींग स्वतःहून दरमहा पाठविण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वीजग्राहक राज्यात आघाडीवर आहेत.

एमपीसी न्यूज – गेल्या पाच महिन्यांमध्ये पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील 6 लाख 9 हजार 905 लघुदाब वीजग्राहकांनी स्वतःहून महावितरणकडे मीटर रिडिंग पाठविले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 4 लाख 45 हजार 300 ग्राहकांचा समावेश असून त्यातील 89 हजार 494 ग्राहकांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात मीटर रिडींग पाठविले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार लॉकडाऊन कालावधीत वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आली होती. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून अनलॉकनंतरही ही सोय कायम ठेवण्याची तसेच मीटर रिडींग पाठविण्याची मुदत वाढवून देण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

त्याप्रमाणे रिडींग पाठविण्याची मूदत 24 तासांऐवजी आता पाच दिवस करण्यात आली आहे. वीजमीटरचे रिडींग स्वतःहून दरमहा पाठविण्यामध्ये पुणे जिल्ह्यातील वीजग्राहक राज्यात आघाडीवर आहेत.

गेल्या एप्रिलमध्ये 74590, मे- 105173, जून- 74314, जुलै- 101731 आणि ऑगस्टमध्ये 89494 वीजग्राहकांनी स्वतःहून मोबाईल ॲप व महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे महावितरणकडे मीटर रिडींग पाठविले आहे.

गेल्या पाच महिन्यांमध्ये पुणे शहर- 235417, पिंपरी चिंचवड शहर – 119590 तर पुणे ग्रामीण भागातील 90295 वीजग्राहकांनी स्वतःहून रिडींग पाठविले आहे.

महावितरणकडून प्रत्येक महिन्याच्या 1 ते 25 मधील एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे.

या निश्चित तारखेच्या एक दिवसआधी ग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती दरमहा करण्यात येत आहे. हा मेसेज मिळाल्यापासून पाच दिवसांच्या कालावधीत ग्राहकांना मीटरचे केडब्लूएच (kWh) रिडींग व फोटो स्वतःहून पाठविता येईल.

महावितरण मोबाईल ॲपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक केल्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा. मीटर रिडींग घेताना वीजमीटरच्या स्क्रिनवर तारीख व वेळेनंतर रिडींगची संख्या व केडब्लूएच (kWh) असे दिसल्यानंतरच (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा. त्यानंतर फोटोनुसार मन्यूअली रिडींग ॲपमध्ये नमूद करावे व सबमीट करावे.

मोबाईल ॲपमध्ये लॉगीन केल्यानंतर मीटर रिडींग थेट सबमीट करता येईल. मात्र गेस्ट म्हणून मीटर रिडींग सबमीट करताना नोंदणीकृत मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी क्रमांक नमूद करावा लागेल.

ज्या ग्राहकांना www.mahadiscom.inवेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करायचे आहे त्यांनी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करणे आवश्यक आहे.

विविध फायद्यांसह बिलाची पडताळणी देखील शक्य होत असल्याने वीजग्राहकांनी दरमहा स्वतःहून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) नाळे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.