Pune crime News : हडपसर पोलिसांची मोठी कामगिरी, 18 गावठी पिस्टल व 27 जिवंत काडतूसासह 6 जणांना अटक

एमपीसी न्यूज – 18 गावठी पिस्टल व 27 जिवंत काडतूसे जवळ बाळगणा-या सहा जणांना हडपसर पोलिसांनी सापळा रचून रविवारी (दि.20) अटक केली. त्यांच्याकडून 18 गावठी पिस्टल, 27 जिवंत काडतूसे व एक चोरीची दुचाकी असा एकूण 5.68 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर पोलीसांची पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आजवरची ही सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे.

अरबाज रशिद खान (वय 21, रा. शिरुर, ता. शिरुर जि. पुणे), सुरज रमेश चिंचणे ऊर्फ गुळया (वय 22, रा. गंगानगर, वरद विनायक कॉलनी, फुरसुंगी, पुणे), कुणाल नामदेव शेजवळ ऊर्फ यश (वय 19 रा. शिरुर, बुरुड आळी, ता. शिरुर जि. पुणे), जयेश राजू गायकवाड ऊर्फ जय (वय 23, रा. शिरुर, लाटे आळी, ता. शिरुर जि. पुणे), विकास भगत तौर ऊर्फ महाराज (वय 28, रा. लक्ष्मीनगर येरवडा, पुणे), शरद बन्सी मल्लाव (वय 21 रा मु. पो. काचेआळी, ता. शिरुर जि. पुणे), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

अटक आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या पूर्वी त्यांच्यावर पुणे शहर व पुणे ग्रामीण परिसरात पिस्तुल तस्करीचे, तसेच मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी अरबाज रशिद खान हा मंचर पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण यांचे गुन्हयात हवा असलेला आरोपी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील कानिफनाथ वस्ती येथे मोकळ्या मैदानावर सहा जण संशयितरित्या थांबले असून त्यांच्या कमरेला पिस्टल असल्याची गुप्त माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार नुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचून संशयित आरोपींनी ताब्यात घेतले.

आरोपींचा झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ 18 गावठी पिस्टल, 27 जिवंत काडतूसे व एक चोरीची दुचाकी असा एकूण 5 लाख 68 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून त्यांचा मध्यप्रदेश राज्याचे पिस्तुल तस्करीच्या साखळी बाबत अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.