Pune News : पुणे पदवीधरसाठी 62 तर शिक्षकसाठी 35 उमेदवार रिंगणात

एमपीसी न्यूज : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज, मंगळवारी शेवटचा दिवस होता. पदवीधर मतदारसंघात 16, तर शिक्षक मतदारसंघासाठी 15 जणांनी माघार घेतली. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या रिंगणात 62, तर शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार असणार आहेत.

पदवीधरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला बंडखोरी टाळण्यात यश आले आहे. आता पदवीधरसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपसह राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्षांच्या 13 उमेदवारांसह 62 उमेदवार रिंगणात उतरल्याने रंगतदार लढती होण्याची शक्यता आहे.

तर शिक्षक मतदारसंघात 35 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपाकडून सांगलीचे संग्राम देशमुख, तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेकडून अरूण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजी पदवीधर आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पदवीधरची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

तर शरद पवार, अजितदादा पवार यांच्यासह शिवसेना-काँग्रेसने देखील महाविकास आघाडीचा पहिला आमदार निवडून आणण्यासाठी व्युहरचना करत आहेत.

त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.