Pune News : वीजबिल भरण्यासाठी 65 लाख वीजग्राहक ‘ऑनलाईन’

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा भरणा करण्याची ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत महावितरणचे 65 लाख वीजग्राहक दरमहा सरासरी 1 हजार 416 कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करीत आहेत.

महावितरणची वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप तसेच अन्य पर्यायांद्वारे ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा क्रेडीट कार्ड वगळता निःशुल्क करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात वीजबील भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहणे किंवा गर्दी टाळून घरबसल्या कोणत्याही वेळेत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्याची सोय वीजग्राहकांना उपलब्ध आहे.

सद्यस्थितीत कोकण प्रादेशिक विभागात 30 लाख 54 हजार वीजग्राहक दरमहा सरासरी 695 कोटी रुपयांचा तर पुणे प्रादेशिक विभाग 18 लाख 71 हजार ग्राहक 425 कोटी 80 लाख रुपयांचा, नागपूर प्रादेशिक विभागात 10 लाख 88 हजार ग्राहक 189 कोटी 64 लाख रुपयांचा आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात 4 लाख 94 हजार वीजग्राहक 105 कोटी 41 लाख रुपयांचा ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करीत आहे.

महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच जून 2016 पासून मोबाईल अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वीजग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडणी बाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे वीजबिल भरणा केंद्रात जाऊन रांगेत उभे राहण्याऐवजी ‘ऑनलाईन’ वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती वाढलेली आहे.

लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅकींग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीटकार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.