Pune News : पुणे जिल्ह्यात साडे दहा लाख ग्राहकांची 687 कोटी थकबाकी ; 65,179 ग्राहकांचे कनेक्शन कट

एमपीसी न्यूज – महावितरणच्या वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुली सुरू आहे. वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीत पुणे जिल्ह्यात 10 लाख 49 हजार 341 ग्राहकांकडे 687 कोटी 61 लाख एवढी थकबाकी आहे. तर, पुणे जिल्ह्यातील 65 हजार 179 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

महावितरणच्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यात 4 लाख 36 हजार 38 ग्राहकांकडे 231 कोटी 15 लाख, सांगली जिल्ह्यात 2 लाख 60 हजार 798 ग्राहकांकडे 120 कोटी 43 लाख, सोलापूर जिल्ह्यात 3 लाख 26 हजार 555 ग्राहकांकडे 164 कोटी 83 लाख आणि सातारा जिल्ह्यात 1 लाख 89 हजार 775 ग्राहकांकडे 63 कोटी 23 लाख रुपयांची थकबाकी आहे.

थकीत वीजबिलांचा भरणा न झाल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे व दिवसेंदिवस ही मोहीम तीव्र करण्यात येत आहे. आतापर्यंत गेल्या फेब्रुवारीपासून पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 338 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यामध्ये कोल्हापूर- 5148, सांगली- 6943, सोलापूर – 9876 व सातारा जिल्ह्यातील 13192 थकबाकीदारांचा कनेक्शन कट करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील 22 लाख 62 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 1267 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी असून आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या महावितरणला सहकार्य करीत ही थकबाकी भरण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे मागील वर्षी मार्चअखेर केवळ 381 कोटी रुपयांची थकबाकी होती. या तुलनेत ही थकबाकी सध्या 1267 कोटी 25 लाख झालेली आहे. यामध्ये घरगुती 19 लाख 75 हजार 442 ग्राहकांकडे 833 कोटी 37 लाख, वाणिज्यिक 2 लाख 41 हजार 951 ग्राहकांकडे 244 कोटी 17 लाख आणि 45 हजार 114 औद्योगिक ग्राहकांकडे 189 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी आहे.

थकबाकीदारांना वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळयची असेल तर, चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल ऍप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.