Pune News : पुणे शहरातील 77 टक्के बेड रिक्त

एमपीसी न्यूज – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शहरातील उपलब्ध बेडपैकी 77 टक्के बेड रिक्त झाले असून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये केवळ 199 रुग्ण दाखल आहेत. दरम्यान, रुग्ण कमी होत असले‌ तरी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची टक्केवारी मात्र फारसी कमी होताना दिसत नाही.

शहरात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढल्याने महापालिका प्रशासनाने शासकीय रुग्णालयांसह शहरातील खासगी रुग्णालयांमधील बेड कोरोना उपचारासाठी आरक्षित केले होते. याशिवाय लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या‌ आणि ज्यांची घरामध्ये वेगळे राहण्याची व्यवस्था नससेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सुरु केली आहेत.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शहरात जवळपास 12 हजार 580 बेड उपलब्ध करण्यात आले. यामध्ये साधे बेड – 1903, ऑक्सिजन बेड – 6216, आसीयु बेड – 652, व्हेंटिलेटर बेड – 712, सीसी सेंटर बेड – 3017 बेडचा समावेश आहे. असे असले तरी मार्च आणि एप्रिल महिन्यात रुग्णांना बेड मिळण्यासाठी कसरत करावी लागली.

मात्र, मे महिन्याच्या मध्यापासून शहरातील रुग्णसंख्या कमी कमी होत आहे. दुसऱ्या लाटेत शहरातील सक्रीय रुग्णांची‌सख्या 56 हजाराच्या घरात पोहचली होती, ती आज 5 हजारावर आली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरात उपलब्ध असलेल्या 12 हजार 580 बेडपैकी 77 टक्के म्हणजे 9 हजार 692 बेड रिक्त आहेत. ही माहिती महापालिका प्रशासनाने जाहीर केली असून सीसी सेंटरमधील 3 हजार 17 बेडपैकी केवळ 199 बेड व्यस्त आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.