Pune News : मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेचा 918 कोटींचा हिस्सा देऊ नये : काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज : मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महापालिकेचा 918 कोटीचा हिस्सा असणार आहे. परंतु 40 हजार कोटी बजेट असून देखील मुंबई व नागपूर या दोन्ही महापालिकांनी कुठलेही पैसे मेट्रो प्रकल्पासाठी दिलेले नाहीत. मग पुणे महापालिकेने मेट्रो प्रकल्पासाठी आपला हिस्सा का द्यावा, असा प्रश्न उपस्थित करून पुणे मनपाने मेट्रोला हिस्सा देवू नये, यासाठी राज्य सरकारकडे काँग्रेस प्रयत्न करण्याचा निर्धार पुणे शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

महापालिकेच्या सभागृहात माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली 1992 ते 2017 या कालावधीतील 80 हून अधिक आजी माजी नगरसेवकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, सतीश देसाई, माजी महापौर कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन यांच्यासह आजी माजी नगसेवक उपस्थित होते.

काँग्रेस गटनेते बागुल म्हणाले, पीएमपीएमएल कंपनी तोट्यात आहे. महापालिकेला तुटीपोटी दरवर्षी 200 कोटी निधी देण्यासाठी महापालिकेची दमछाक होत आहे.

पुणे मनपाची सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो बरोबर पूर्वीप्रमाणे पी.एम.पी.एम.एल ऐवजी पी.एम.टी. सुरू केली तर त्यावर मुख्य सभेचे नियंत्रण राहील. एच.सी.एम.टी.आर. प्रकल्प किती नागरिक मृत्यूमुखी पडल्यावर प्रशासन मार्गी लावणार आहे याचा जाब प्रशासनाला पुणेकरांनी विचारला पाहिजे.

तसेच शहरातील 2000 किलोमीटरचे रस्ते रुंद करणे आवश्यक असून यामुळे शहरातील वाहतूक समस्यांचे निराकारण होणार आहे. पक्षवाढीसाठी सर्व आजी माजी सदस्यांनी लेखी तक्रारी व समस्या द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उल्हास पवार, सतिश देसाई यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांनी मनोगतपर भाषणे केली. तर वीरेंद्र किराड यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.