Pune News : पुण्यातील 22 वर्षीय नृत्यांगनेची नैराश्यातून आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुण्यातील 22 वर्षीय नृत्यांगना विशाखा काळे हिने नैराश्यातून हडपसरच्या गोंधळेनगर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (दि.6) दुपारी हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा ही नृत्यांगना होती. काही महिन्यांपूर्वी तिचा अपघात झाला होता. यात तिच्या चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. यामुळे देखील ती घरी असे. तिला शो करता येत नव्हते. तर तिचे चित्रपट सृष्टीत काम करण्याचे स्वप्न होते, मात्र अपघात झाला आणि घरी बसावे लागले. त्यातच लॉकडाऊन झाले. त्यामुळे सर्व ठप्प झालं.

नामवंत निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्र गौरवगाथा व अरुण गायकवाड यांच्या गर्जा हा महाराष्ट्र या कार्यक्रमांमध्ये विशाखा काम करायची. विशाखाचे वडील अंध असून आई एका खासगी शाळेत सेविकेचे काम करते. घऱाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यात लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नसल्याने विशाखाला नैराश्य आले होते, असे समजते.

आधीच अपघातामुळे घरी राहून गेले आणि आता लॉकडाऊनमुळे त्यांचे कार्यक्रम कमी झाले. काही दिवसांनी कार्यक्रम होणे पूर्णपणे बंद झाले आणि नवीन कार्यक्रम मिळत नव्हते. यामुळे ती नैराश्यात होती.

दरम्यान मंगळवारी तिचे आई-वडील आणि बहीण बाहेर गेले असता तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.