Pune News : मालकासोबत प्राणायाम करणारा श्वान होतोय सोशल मीडियावर व्हायरल

एमपीसी न्यूज – मालकासोबत ओम जाप करणा-या राजा श्वानावर सध्या सोशल मीडियावर लाईक्स, कमेंटचा चांगलाच पाऊस पडत आहे. हा श्वान आहे पुणे पोलीस दलातील पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांचा. राजा दररोज सकाळी पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या सोबत प्राणायाम करतो. कुंभार यांना ड्युटीमुळे कधी प्राणायाम करायला सुट्टी घ्यावी लागली तर राजा एकटाच सकाळच्या ठरलेल्या वेळी प्राणायाम करतो.

पोलीस निरीक्षक महादेव कुंभार दररोज व्यायाम करतात. पहाटेच्या वेळी जॉगिंग करण्यासाठी निघाल्यानंतर त्यांच्या सोबत राजा नावाचा त्यांचा श्वान देखील निघतो. बाहेर मोकळ्या वातावरणात जॉगिंग करून आल्यानंतर कुंभार आणि राजा श्वान दोघेही प्राणायाम करतात.

प्राणायाम करताना ओम जप केला जातो. घरातील मंडळींनी प्राणायामाचा ओम जाप सुरु केला की राजा सुद्धा त्याच्या स्टाईलमध्ये ओम जाप सुरु करतो. हा व्यायाम राजा दररोज करतो. एखाद्या दिवशी कुंभार यांना ड्युटीमुळे व्यायाम करता आला नाही तर त्या दिवशी राजा स्वतः प्राणायामाला सुरुवात करतो.

प्राणायाम करताना तो कुंभार यांना झोपेतून उठवण्याचाही प्रयत्न करतो. राजाच्या रूपाने कुंभार यांना व्यायामासाठी चांगला जोडीदार मिळाला आहे. राजाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्यावर नेटिझन्सकडून लाईक्स आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.