Pune News : ए.पी.जे. अब्दुल कलाम खऱ्या अर्थाने पिपल्स प्रेसिडेंट -रघुनाथ माशेलकर

एमपीसी न्यूज- वेगवेगळ्या खिडक्यांमधून पाहताना जग वेगवेगळे दिसते; पण सगळ्या खिडक्यातून पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तिमत्वाची पूर्णपणे ओळख होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे अतिशय संवेदशील, सहृदय, शालीन, विनम्र असे व्यक्तिमत्व होते. लहान मुलांविषयी त्यांना विशेष कौतुक होते, युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता होती, ते खऱ्या अर्थाने ‘पिपल्स प्रेसिडेंट’ होते, असे गौरवोद्गार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर (Pune News) यांनी काढले.

मराठवाडा लेखिका संमेलनाच्या माजी अध्यक्षा, माजी प्राचार्य डॉ. छाया महाजन यांच्या लेखन प्रवासातील चाळीसावे पुस्तक असलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन आज (दि.30) पत्रकार भवन येथे डॉ. माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी  व साकेत प्रकाशनचे साकेत भांड यावेळी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. छाया महाजन यांनी डॉ. कलाम यांच्याविषयी पुस्तक लिहून मोठे समाजकार्य केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा भावी पिढीला उपयुक्त आहे. त्यामुळे लेखिकेचे फक्त अभिनंदनच नाही तर समाजातर्फे आभार मानतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आपण कधी, कुठे, कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते; परंतु आयुष्यात पुढे कोण व्हायचे हे मात्र आपल्या हातात नक्की असते, असे नमूद करून डॉ. माशेलकर म्हणाले, डॉ. छाया महाजन यांनी अनेक प्रकारच्या साहित्यकृतींची निर्मिती केली आहे. हे पुस्तक आवडल्याने मी पुस्तकाची प्रस्तावना आनंदाने लिहिली आहे. हे पुस्तक वाचायला हाती घेतले की खाली ठेवावेसे वाटत नाही, अशी त्यांनी लेखनातून मांडणी केली आहे.

landi News : सुयश मंगल कार्यालयात सहस्त्रचंद्र व अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात पार

प्राचार्य डॉ. छाया महाजन यांच्या लिखाणाविषयी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, लेखिकेचा साहित्य क्षेत्रातील प्रवास विलक्षण आहे. त्यांनी विविध  विषयांवर लिखाण केले आहे.  काळवंडलेली मने प्रज्वलित करणाऱ्या राष्ट्रपतींविषयी सकारात्मक विचारांचा जागर करणारे लिखाण लेखिकेने या पुस्तकाच्याद्वारे केले आहे. डॉ. कलाम यांच्या चरित्रचिंतनाबरोबरच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही या पुस्तकाद्वारे वाचकांसमोर येते. हिमालयासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जनसामन्यांसमोर आणणे हे लेखकाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सूचित केले.

लेखन प्रवासाविषयी बोलताना प्राचार्य डॉ. छाया महाजन म्हणाल्या, समीक्षकांनी साहित्याची दखल घेतली नाही, तरी मला समीक्षकापेक्षा वाचक आणि प्रकाशक महत्त्वाचा वाटतो. वाचकांनी साहित्यकृती स्वीकारल्यामुळे चाळीस पुस्तकांच्या लेखनापर्यंत प्रवास करता आला आहे. कोणासारखे दिसावे, असावे, लिहावे यात अडकायचे नाही हे मनात पक्के ठरवून लेखन प्रवास केल्याने सर्जनशीलतेला वाव मिळून माझ्या हातून सहजतेने लिखाण घडले.  स्त्रीने स्त्रीविषयी, स्त्रीसाठीच लिहिले पाहिजे हा स्त्री-पुरूष भेदाभेद मला अमान्य आहे. स्त्री आणि पुरूष हे दोघेही माणूसच आहेत त्यामुळे लेखक म्हणून भेदाभेद असू नये ही आपली स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगीतले.

मान्यवरांचे स्वागत डॉ. चेतन महाजन, डॉ. अमित महाजन, प्रतिमा भांड, गौरी महाजन, ज्योती नांदेडकर यांनी केले. प्रकाशकीय प्रास्ताविक प्रतिमा भांड यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे यांनी केले तर आभार ज्योती नांदेडकर यांनी मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.