Pune News : ‘व्यसनमुक्ती उपचार’ या विषयावर दोन दिवसीय परिषद

एमपीसी न्यूज – पुण्यात ‘व्यसनमुक्ती उपचार’ या विषयावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ तसेच समुपदेशक मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार (दि.26) व रविवार (दि.27) सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम जी सभागृहात ही परिषद होणार आहे.

व्यसनाचं वाढतं प्रमाण यावर सखोल चर्चा व्हावी या उद्देशाने मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे, कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर्स, नर्सेस, सायकॉलॉजिस्ट, काउन्सेलर, व्यसनमुक्तीसाठी काम करणारे इच्छुक, समाजसेवक, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी व मानसोपचार तज्ज्ञ सहभागी होऊ शकतात असे आयोजक, डॉ. प्रकाश महाजन यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दोन  दिवसीय परिषदेमध्ये विविध वयोगटातील व्यक्तींना जडणारी व्यसने, त्यांचे व्यवस्थापन, औषधोपचार, समुपदेशन, सल्ला यांचा समावेश आहे. या परिषदेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र दिले  जाणार आहे. 14 व्‍याख्‍याने आणि व्यसनमुक्त झालेल्या काही व्यक्तींचे मनोगत असे परिषदेचे स्वरूप आहे.

मद्य, तंबाखू, इतर अंमली पदार्थ याच बरोबर स्क्रीन/ व्हिडिओ आणि त्यामुळे निर्माण होणारी स्थिती, या सर्वांसाठी करायची उपाययोजना, विविध थेरपीज (मोटिव्हेशनल एन्हांसमेंट थेरपी, फार्माकोथेरपी), कौटुंबिक समुपदेशन अशा विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.