Pune News : लोणी येथे सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारणार – पुनीत बालन

एमपीसी न्यूज – इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या वतीने लोणी परिसरात दहा एकर जागेची उपलब्धता झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारण्यात येईल. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल तसेच लोणी गावाचा नावलौकीक राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात वाढविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल, अशी माहीती इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.

आंबेगाव येथील लोणीच्या भैरवनाथ विद्याधाम प्रशालेच्या प्रांगणात माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याच्या कामासाठी इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या वतीने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाचे भुमीपूजन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन पुनीत बालन व आर. एम. धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते झाले यावेळी बालन बोलत होते.

याप्रसंगी गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड, प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, वस्तू व सेवाकर उपायुक्त अरिफ मुलाणी, सेवानिवृत्त कृषी उपसंचालक प्रकाश सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लांबहाते, पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, चेतन लोखंडे, संतोष पडवळ, उपसरपंच राणी गायकवाड, पोलीस पाटील संदीप आढाव, प्राचार्य गोरक्षनाथ दळवी, सावळेराम नाईक, दिलीप वाळुंज, सोमनाथ कदम, उद्योजक राजेश वाळुंज, ग्रंथमित्र रमेश सुतार, अशोक आदक पाटील, सुरेश वाळुंज, पांडुरंग वाळुंज, संजय सिनलकर, प्रकाश वाळुंज उपस्थित होते.

पुनीत बालन पुढे म्हणाले, सामाजिक कामात कधीही राजकारण येता कामा नये. इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या माध्यमातून सातारा जिल्हा परिसरात सहा ते सात हजार गरजू विद्यार्थीनींना सायकलचे वाटप करण्यात आले आहे, तेवढ्याच संख्येने शाळांना संगणक वाटप देखील करण्यात आले आहे. 1084 शाळांमध्ये पुस्तकपेढी स्थापन केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस, आरोग्य कर्मचारी, वर्तमान पत्र वितरक त्याचबरोबर हजारो गरजू कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. शाळेच्या इमारतीचे काम वर्षभरात पुर्ण केले जाईल असे त्यांनी सांगीतले.

दरम्यान, मी शहरात राहतो पण काम ग्रामिण भागात करतो, खेड्यांच्या विकासासाठी झटतो याचा अर्थ मी मागच्या जन्मी शेतकरी कुटुंबात जन्मलो असेल असे पुनीत बालन म्हणाले.

जान्हवी धारीवाल म्हणाल्या, इमारतीचे काम पुर्ण झाल्यानंतर परिसरात 10 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. कैलास गायकवाड म्हणाले, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून एक कोटी रुपये खर्च करुन पहिल्या मजल्याचे काम पुर्ण केले आहे नंतर आर्थिक कमतरता भासू लागल्यानंतर चेतन लाखंडे यांच्या माध्यमातून पुनीत बालन यांची भेट झाली आणि त्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे काम मार्गी लागले.

या प्रसंगी पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, सरपंच ऊर्मिला धुमाळ, माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमात शाळेच्या प्रस्तावित प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. पहील्या टप्प्यासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश प्रबोधिनीकडे सुपूर्त करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते तानाजी राजगुडे यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांचा धनादेश यावेळी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुर लोखंडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अविनाश वाळुंज यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III