रविवार, जानेवारी 29, 2023

Pune News : पर्यटनासाठी जीवधन गडावर आलेल्या दिल्लीतील तरुणीचा खोल दरीत कोसळून मृत्यू

एमपीसी न्यूज – जुन्नर तालुक्यातील नानेघाट परिसरात मित्रांसह पर्यटनासाठी आलेल्या दिल्लीतील तीस वर्षीय तरुणीचा किल्ल्यावरून खाली उतरत असताना पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रुचिका संजीव शेठ (वय 30) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिका ही मूळची दिल्लीची आहे. तिची पीएचडी पूर्ण झाली असून दिल्लीतील एका नामांकित कंपनीत ती काम करत होती. तीन दिवसांपूर्वी ती भावासोबत दिल्लीहून मुंबईला आली होती. त्यानंतर मुंबईतून काही मित्रांसोबत मंगळवारी दुपारी पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यातील नानेघाट परिसरात आले होते. मंगळवारी रात्री त्यांनी जुन्नर परिसरातीलच एका हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि आज सकाळी जीवधन किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते.

जीवधन किल्ल्यावरून खाली उतरत असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेवाळलेल्या पायरी वरून तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत कोसळली. तिच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी स्थानिकांना याची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी खोल दरीत उतरून तिचा मृतदेह बाहेर काढला. जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात तिचा मृतदेह ठेवण्यात आला आहे.

रुचिकाचे आई-वडिल दिल्लीवरून येण्यासाठी निघाले आहेत. ते आल्यानंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. जुन्नर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Latest news
Related news