Pune News : आंबील ओढा कारवाईप्रश्नी राज्य सरकाराने हस्तक्षेप करावा : आम आदमी पार्टी

एमपीसीन्यूज : पुण्यातील आंबील ओढा रहिवासी बांधकामे पाडण्याची कारवाई ही तोंडी आदेशाने केल्याचा आरोप करीत या अन्याय कारवाईचा आम आदमी पार्टीच्यावतीने मुकुंद किर्दत, डॉ. अभिजित मोरे, सैद अली, मोहनसिंग रजपूत, किशोर मुजुमदार यांनी निषेध केला. या कारवाई प्रश्नी आता राज्य सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही आपच्यावतीने करण्यात आली आहे.

आंबील ओढा येथील कारवाईदरम्यान उपस्थित महापालिका वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे कारवाईच्या आदेशाची कोणतीही कागदपत्रे नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच महापौर, आयुक्त, स्थानिक नगरसेवक व बिल्डर यांच्या संयुक्त बैठकानंतर ‘तोंडी आदेश’ देत ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

कारवाई करण्यापूर्वी जनतेच्या प्रतिनिधींनी सुद्धा स्थानिक रहिवाश्यांना विश्वासात घेतले नाही. शिवाय त्यांना हमी देणारे कोणतेही कागदपत्रे या रहिवाश्यांना दिली जात नसल्याचे रहिवासी सांगत आहेत. कोरोना काळात स्थानिक रहिवासी आर्थिक तडाख्याने अडचणीत असताना दुसरीकडे लॉकडाउन पूर्णपणे उठला नसताना ही कारवाई करणे अयोग्य आहे.

याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कोरोना काळासाठी मार्गदर्शक आदेश देत 9 जुलैपर्यत अशी सरसकट पद्धतीने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. त्या प्रमाणे या प्रकरणासंदर्भात कोर्टाचे आदेश घेणे गरजेचे होते.

वट सावित्रीच्या सणादिवशी लॉकडाउन काळात जनतेला उघड्यावर आणणाऱ्या प्रशासन, सत्ताधारी यांचा आम आदमी पार्टी निषेध करते व राज्य सरकारने यात हस्तक्षेप करावे, असे आवाहन आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.