Pune News : महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार पुण्यात फक्त 157 मुताऱ्या

861 सुलभ सशुल्क शौचालये, तर सार्वजनिक शौचालये 363

एमपीसी न्यूज : ‘पुणे तिथे काय उणे…’ ही म्हण आपल्याला ठाऊकच आहे. तब्बल 40 लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या पुण्यात फक्त 157  मुताऱ्या असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तर सुलभ सशुल्क शौचालयांची संख्या 861  इतकी असून, 363  सार्वजनिक शौचालये असल्याचे महापालिकेच्या अधिकृत आकडेवारीमध्ये स्पष्ट झाले आहे.

शहरातील रस्ता रुंदीकरण, विविध प्रकल्प, नवीन बांधकामे, दुरवस्था व दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर महापालिकेकडून शहराच्या कानाकोपऱ्यातील सार्वजनिक मुताऱ्या तोडण्याची कारवाई केली जाते.

काही वर्षांपूर्वीपर्यंत एखादी सार्वजनिक मुतारी जमिनदोस्त करायची असेल तर महिला बालकल्याण समिती ते स्थायी समिती त्यानंतर मुख्य सभेत अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव प्रलंबित राहात होता.

परंतु, वाढत्या नागरीकरणामुळे विविध प्रकल्प उभारणी व विकासकामांमध्ये सार्वजनिक मुताऱ्या पाडण्यासाठी प्रशासकीय विलंब होत होता.

परिणामी विविध कामे अनेक वर्षे रखडत होती. त्यानंतर कुठल्याही समित्यांच्या परवानगी शिवाय स्थानिक क्षेत्रिय कार्यालय स्तरावर सार्वजनिक मुताऱ्या पाडण्याचे अधिकार देण्यात आले. त्यामुळे शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची संख्या घटल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे पालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या संदर्भातील आकडेवारी महापालिका प्रशासनाकडून मागविली असता ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

या संदर्भात बागुल म्हणाले, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सार्वजनिक शौचालये उभारणी आणि तोडण्याचे अधिकार होते. लोकसंख्या आणि किलोमीटरच्या प्रमाणात मुताऱ्या उभारल्या जात होत्या.

विविध समित्यांच्या परवानगीनंतर मुख्य सभेची अंतिम मंजुरी घेतल्यानंतर एखादी मुतारी तोडली जात असे. परंतु प्रशासकीय दिरंगाई टाळण्यासाठी समित्यांच्या परवानगीची अट शिथील केली. रस्ते, विविध विकासकामे तसेच नागरिकांच्या तक्रारीनंतर मुताऱ्या पाडल्यामुळे संख्या घटली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.