Pune News : ॲक्युरेट गेजिंगच्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायू दूत’चे लोकार्पण

एमपीसी न्यूज – पुण्यातील हायटेक कंपनी ॲक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायू दूत’चे आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डीवाइस ‘एएफ-100’ व ‘एएफ-60’ या मशिनचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ॲक्युरेट गेजिंग एजिमेडचे व्यवस्थापकिय संचालक विक्रम साळुंखे, संचालक संभाजी दिवेकर, रवीशंकर कुलकर्णी, दिलीप काटकर, प्रविण थोरवे, सतिश एम, स्वाती जोशी आदी उपस्थित होते.

मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट हा प्राणवायू दूत 250 एल. पी. एम. (लिटर प्रति मिनिट) क्षमतेचा असून, जिल्हा आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग आणि आपत्ती झोनमधील 20 ते 50 बेडच्या हॉस्पिटलची आपत्कालीन गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे. याची मांडणी करणे अतिशय सोपे असून, हा 30 मिनिटांच्या आत सेवा देण्यास सज्ज होतो. अत्याधुनिक स्थान/जी. पी. एस. ट्रॅकिंग आणि रियल टाइम (आय. ओ. टी.) मॉनिटरिंगमुळे हा सर्वात प्रगत आणि एकमेव मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ठरतो.

प्राणवायुदूत हा पूर्ण मोबाइल, ट्रेलर आरोहित (माउंटेड) आणि कंटेनरमध्ये अशा तीन प्रकारात येतो. यामुळे शहर प्रशासनाकडून अग्निशमन दलाच्या साहाय्याने 30 ते 50 किलोमीटरच्या टप्प्यातील रुग्णालयांच्या आपात्कालीन आवश्यकतांची पूर्तता करता येणे सहज शक्य होणार आहे. प्राणवायुदुतमध्ये ऑक्सिजन सिलिंडर भरण्याची सुविधा असून रुग्णवाहिकांमधील ऑक्सिजन सिलिंडर्स भरण्यासाठीही वापरता येतो.

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सनट्रेटरचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका नंदा लोणकर यांच्यातर्फे कोविड हॉस्पिटलसाठी लागणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नगरसेविका नंदा लोणकर, माजी महापौर प्रशांत जगताप व पदाधिकारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.