Pune News : राज्य सरकारवर आरोप हा पुण्यातील भाजप नेत्यांचा बालीशपणा : मोहन जोशी

एमपीसीन्यूज : केंद्रात आणि महापालिकेत सत्तेत असलेलया भारतीय जनता पक्षाकडून राज्य सरकारवर दुजाभाव केल्याचा आरोप करणे म्हणजे पुण्यातील भाजपचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा निव्वळ बालीशपणा आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसीवीर, कोविड लस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि याकरीता पुण्यातील खासदार गिरीश बापट, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला आणि त्यातही पुण्याला जास्तीतजास्त सुविधा मिळवून देणे गरजेचे आहे. ती वैद्यकीय सामुग्री मिळवल्यावर पुणेकरांसाठी त्याचे वितरण व्यवस्थितपणे करुन देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.

या दोन्ही आघाड्यांवर ठोस काम न करता केवळ राज्य सरकार पुण्याबाबत दुजाभाव करत असल्याचा ठपका ठेवणे आणि याकरता महापालिका आयुक्तांना निवेदन देणे ही कृती म्हणजे निव्वळ बालीशपणा आहे.

भाजपच्या नेत्यांना राज्य सरकारचे लक्ष वेधायचे होते तर त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यावयाचे होते. ते न करता आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी बालीश राजकारण केले आहे. त्यामागे पुणेकरांविषयी काही आस्था आहे, असे दिसत नाही, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना साथीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन रेमडेसीवीर इंजेक्शनचा जादा पुरवठा व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्यानुसार महाराष्ट्राला जादा वाटा मिळाला. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लगेच आभारही मानले, याकडेही मोहन जोशी यांनी लक्ष वेधले.

अशा प्रकारचे सहकार्य पुण्यातील भाजपचे खासदार, आमदार यांच्याकडून अपेक्षित आहे परंतु, तसे काही घडताना दिसत नाही, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.