Pune News : सर्वसाधारण सभा घेण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आजही आरोप प्रत्यारोप

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. त्यावर चर्चा करण्याची नगरसेवकांची मागणी आहे. मात्र, भाजपला वाटेल तेव्हा सर्वसाधारण सभा घेणार का, असा सवाल काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेनेतर्फे उपस्थित करण्यात आला. तर, राज्यात तुमचे सरकार आहे. मुख्यमंत्री यांच्याकडून आदेश आणा मग सभा घेऊ, असे उत्तर भाजपतर्फे देण्यात आले. त्यामुळे मंगळवारीही सर्वसाधारण सभा घेण्यावरून ऑनलाइन सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांत आरोप प्रत्यारोप झाले.

पुण्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सभा होणे गरजेचे आहे. मात्र, भाजपला वाटत नाही, तोपर्यंत सभा घेणार नाही का? असा सवाल काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी उपस्थित केला.

ठाकरे सरकारचे आदेश आहेत. त्याप्रमाणे कामकाज होत आहे. सभा चालविण्यासाठी आधी सरकारचे आदेश घेऊन या, असे सभागृह नेते धीरज घाटे यांनी विरोधी पक्षांना सुनावले.

आजच्या सभेत काहीही चर्चा करायची नाही, असे ठरले होते. तरीही आपण त्याच मुद्यावर का बोलत आहात, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. ऑनलाईन सभा घेण्यासाठी शासनाचे काय आदेश आहेत ते आधी वाचा, अशी मागणी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.

_MPC_DIR_MPU_II

शासनाचे आदेश पुढे करून सभा तहकूब करणे बरोबर नाही. शासनाचे आदेश वाचून दाखवा, असे उत्तर शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिले.

विनाकारण प्रसिद्धीसाठी काही तरी बोलणे बरोबर नसल्याचे घाटे म्हणाले. तर, तुम्हाला ठेकेदार भेटले म्हणजे झाले, हीच तुमची भूमिका असल्याचे बागवे यांनी सुनावले. सर्वसाधारण सभा संदर्भात राज्य शासनाचे आदेश वाचण्याची मागणी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक विशाल तांबे यांनीही केली.

तर, ऑनलाईन सभा घेण्यासाठी शासनाचे आदेश आहेत. कोरोनावर चर्चाच करायची नाही. यांना पुणेकरांचे काहीही देणेघेणे नसल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी सांगितले.

तुम्ही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऐकत नव्हते. मात्र, ठाकरे सरकारचे ऐकत आहात, असा चिमटा स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी काढला. त्याला माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक दीपक पोटे, आदित्य माळवे यांनी आक्षेप घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.