Pune News : भाजपची विकासाची प्रतिमा डागाळण्यासाठी आंबील ओढ्याची कारवाई

राष्ट्रवादीने कुटील राजकारण थांबवावे; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – पुण्याचा विकास करायला भाजप सक्षम आहे. हे आव्हान पेलण्याची क्षमता राष्ट्रवादी कॉंग्रेसची नाही. त्यामुळेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपची विकासाची प्रतिमा डागाळण्यासाठी अवैध मार्गाने आंबील ओढा परिसरातील रहिवाशांवर कारवाई करून त्यांना रस्त्यावर आणले. याचा राग पुणेकरांमध्ये असून त्याचे प्रत्यंतर आज आले. माझ्या सोबत प्रशासनाशी चर्चा करायला चला ही खासदार सुप्रिया सुळे यांची विनवणी आंबील ओढा कारवाईसाठी आंदोलन करणाऱ्या पुणेकरांनी धुडकावून लावली. राष्ट्रवादीने पुणेकरांबरोबरचे हे कुटील राजकारण थांबवावे असा इशारा पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला

मुळीक म्हणाले, सहा महिन्यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. साम, दाम, दंड, भेद या सर्वप्रकारच्या नीतींचा अवलंब करून या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस करीत आहे. याच उद्देशाने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आंबील ओढा परिसरातील नागरिकांवर अवैध पद्धतीने कारवाई करण्यात आली. ज्यामुळे निष्पाप रहिवाशांना बेघर व्हावे लागले. नागरिकांना रस्त्यावर आणणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला पुढील निवडणुकीत पुणेकर रस्त्यावर आणतील.

मुळीक पुढे म्हणाले, ‘राष्ट्रवादी आघाडीला पंधरा वर्षात जेवढा पुण्याचा विकास करता आला नाही, त्यांच्या काळात वर्षानुवर्षे केवळ कागदावर असलेल्या योजना भाजपच्या गेल्या चार वर्षांच्या काळात गतीमान झाल्या. या काळात भाजपने शहराचा विकास करून पुणेकरांचा विश्वास संपादन केला आहे. या विकासकामांचे आव्हान पेलण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये क्षमता नाही. त्यामुळेच भाजपची पुणेकरांसमोरील प्रतिमा डागाळण्यासाठी आंबील ओढा येथे राष्ट्रवादीने कॉंग्रेसने कारवाई घडवून आणली. राष्ट्रवादीचा हा कुटील डाव आम्ही कदापी यशस्वी होऊ देणार नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.