Pune News : शहरातील 33 धोकादायक वाडे पालिकेकडून जमीनदोस्त

एमपीसीन्यूज : पुणे शहरात जवळपास 211 धोकादायक वाडे आहेत. त्यापैकी 150 ठिकाणी दुरुस्ती झाली आहे, तर किरकोळ धोकादायक असलेल्या 115 वाड्यांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील 33 धोकादायक वाडे आणि इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.

पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करते.

शहरातील कसबा पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, सदाशिव आणि नवी पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ नाना पेठ, गणेश पेठ आशा विविध पेठांमध्ये चौरसाकृती आणि आयाताकृती शेकडो वाडे आहेत.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेवून महापालिकेने अत्यंत धोकादायक (सी -1), दुरुस्ती आवश्यक (सी -2), रिक्त न करता दुरुस्ती योग्य (सी-२) अशी वाड्यांची वर्गवारी केली आहे. या वर्गवारीनुसार सी 1 मध्ये 4, सी 2 मध्ये 214, सी 3 मध्ये 115 वाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकदायक वाड्यांची पाहणी केली जाते. धोकदायकवाड्यांना इमारती खाली करण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर 33 धोकादायक वाड्यांवर कारवाई केली.

दरम्यान, न्यायालयाच्या परवानगीने महापालिका प्रशासनाने गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात 12 वाड्यांवर कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.