Pune News: पालिका निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

एमपीसी न्यूज – नियोजित वेळापत्रकानुसार पुणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर अखेर होणे अपेक्षित आहे. त्याची तयारी सहा महिने अगोदर करावी लागते. सध्या महापालिका प्रशासनात निवडणुकीच्या तयारीबद्दल कोणतीच हालचाल नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. येत्या दोन, तीन दिवसांत राज्य सरकार तयारीबाबत आदेश काढेल का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा पत्रव्यवहार पुणे महापालिका प्रशासनाने केलेला आहे आणि प्रशासनही राज्य सरकारच्या आदेशाची वाट पहात आहे.

महिपालिकेची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने (वॉर्ड) घ्यायचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने द्विसदस्य पद्धतीने निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे द्विसदस्य पद्धतीनेच निवडणूक होईल असे मानले जाते. सर्वच पक्षांची या प्रस्तावाला अनुकूलता आहे.

एकसदस्यीय, की द्विसदस्यीय पद्धत याबाबत स्पष्टता व्हायला हवी. वॉर्ड रचना, त्यावरील सूचना आणि हरकती, अधिकाऱ्यांच्या नेमणुका, अंतिम मतदार यादी करणे अशा प्रशासकीय हालचाली अद्याप सुरु झालेल्या नाहीत. या पातळीवर शांतता असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 15 ऑगस्टपूर्वी राज्य सरकारकडून निवडणुकीच्या तयारीची परवानगी मिळाल्यास व्यवस्था करणे सोपे जाईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोरोनाची साथ अद्याप नियंत्रणात आलेली नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याकारणाने सर्वच महापालिका पुढे ढकलण्यात येऊन सहा महिन्याकरिता प्रशासक नेमले जातील असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. अशा चर्चा असल्याने इच्छुक उमेदवारांचे लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.