Pune News : अभिनेते अतुल कुलकर्णी ‘येथून’ होणार निवृत्त

एमपीसी न्यूज: अभिनेते अतुल कुलकर्णी हे त्यांच्या QUEST या संस्थेमधून निवृत्त होणार आहेत. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती सगळ्यांना दिली आहे.

शिक्षण क्षेत्रांत काहीतरी काम करण्याच्या हेतूने अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी 1 जानेवारी 2007 रोजी या संस्थेची स्थापना केली होती. स्थापनेपासून ते स्वतः या संस्थेचे अध्यक्ष होते.

आज QUEST संस्था महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातल्या 5700 शाळा, अंगणवाड्यांमधल्या 2 लाख 60 हजार मुलं आणि 9 हजारांच्या वर शिक्षक, प्रशिक्षकांपर्यंत पोहोचली आहे.

गणितातील एका सिद्धांतानुसार जेंव्हा सर्व काही सुरळीत चालले असते आणि आपण यशाच्या शिखरावर असतो, तेंव्हाच आपली आता बाहेर पडायची वेळ झाली आहे, हे आपण समजायचे असते. तसेच नवीन सुरवात करायची असते.

माझा आपल्याकडील ‘आश्रम’ व्यवस्थेवर विश्वास आहे. मी चार आश्रम जमेल तसं सांभाळायचा प्रयत्नदेखील केला आहे. त्यामुळे मी आता निवृत्तीची घोषणा करून वानप्रस्थाकडे जाण्याचा प्रवास चालू केला आहे, याला semi retirement असे म्हणता येईल.

तसेच माझ्या वैयक्तिक आणि इतर सामाजिक जबाबदा-या कमी करणे, अभिनयाच्याच क्षेत्रात पण दुसरे नवीन काहीतरी करू पाहणे, जुनं विसरणं, नवीन शिकणं, comfort zone सोडण्याचा प्रयत्न करणे, असं बरच काही त्यात असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

QUEST मधील आम्ही विश्वस्त मंडळातील सदस्य काही महिने या हस्तांतरणाचे नियोजन करत होतो. मंडळाच्या एकमतानुसार संस्थापक-विश्वस्त आणि उपाध्यक्ष असलेले मनोज कार्येकर हे आता संस्थेचे अध्यक्षपद सांभाळणार असल्याची माहिती अभिनेते कुलकर्णी यांनी दिली आहे.

माझ्या अयुष्यातील फार मोठा भाग QUEST ने व्यापला होता आणि म्हणूनच येथून निवृत्त होणं आवश्यक आहे, असं वाटत असल्याचे अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.