Pune News: COEP मैदानातील जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्ष उपचार सुरू- महापौर मोहोळ

Pune News: Actual treatment begins at Jumbo Covid Center at COEP ground- Mayor Mohol या रुग्णालयात 600 खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयू साठी स्वतंत्रपणे राखीव असतील.

एमपीसी न्यूज – सीओइपी मैदानातील जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रत्यक्ष उपचार सुरू झाले आहेत. या सेंटरमुळे पुणे शहरातील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लागला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिली.

पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) 800 खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय 18 दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे.

पुण्‍यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 32 हजार चौरस मीटर मैदानावर हे 13 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात 600 खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयू साठी स्वतंत्रपणे राखीव असतील.

एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये असलेल्या सर्व सोयी सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टर या कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सुद्धा आहेत. संपूर्ण परिसर, ज्यामध्ये व्यवस्थापन केंद्र, प्रयोगशाळा, औषध केंद्र, डॉक्टरांसाठी विश्रामगृह, उपहारगृह, रुग्ण येण्याचे ठिकाण, वाहनतळ इत्यादी सोयी सुविधा आहेत.

तसेच या दिव्यांगाच्या दृष्टीने सुद्धा सुखकर करण्यात आल्या आहेत. लिक्विड ऑक्सिजन टाकी तसेच राखीव ऑक्सिजन सिलिंडर यामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. ऑक्सिजनयुक्त सहाशे खाटांच्या संपूर्ण वातानुकूलित विभागामुळे हा देशातील सगळ्यात मोठ्या रुग्णालयांपैकी एक बनला आहे. कमी दाबाने वातानुकूलित करण्यात आलेल्या आयसीयूमुळे या विभागात कायम शुद्ध व स्वच्छ हवा खेळती राहिल, याची दक्षता घेण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.