Pune News : कौतुकास्पद! काश्मीरमधील फौजींसाठी राखी घेऊन पोचल्या पुण्यातील तरुणी 

एमपीसी न्यूज – काश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असणा-या भारतीय सैनिकांसाठी पुण्यातील काही तरुणी राखी घेऊन पोचल्या. बहीण-भावाच्या अतूट नात्याला आणखी घट्ट करणा-या ‘रक्षाबंधन’ सणानिमित्त सैनिकांना राखी घेऊन जाण्यासाठी या तरुणींनी ऑनलाईन पध्दतीने देणगी गोळा केली आणि, सरळ काश्मीर गाठले. साहस आणि बहिणीच्या प्रेमाचा अनोखा मिलाफ काश्मीर खोऱ्यात अनुभवायला मिळाला. 

पुण्यातील गौरी हेमंत किणीकर यांच्यासह तिची आई साधना किणीकर, गौरीची बहीण शताक्षी किणीकर आणि तिच्या दोन सहकारी, लॉ कॉलेजच्या शिवानी जोशी आणि सई नंदूकर यांनी हा उपक्रम राबविला. 19 ते 22 ऑगस्ट या कालावधीत तरुणींनी काश्मीरमधील मच्छल, पुश्वरी, काटवार आणि डबपाल याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या भारतीय सैनिकांनी राखी बांधली. याशिवाय काश्मिरी बांधवांना देखील राखी बांधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.

रात्रंदिवस काम करून यासाठी त्यांनी निधी गोळा केला. यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. मच्छल गावात आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठित मान्यवर, लष्कर अधिकारी, स्थानिक प्रमुख आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली याबाबत माहिती देताना किणीकर म्हणाल्या, ‘काश्मिरी बांधवांना आपल्या देशाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. शताक्षी म्हणाल्या, ‘मच्छल खोऱ्यातील तरुण मुलींनी प्रगती आणि आत्मजागृतीसाठी ज्या प्रकारचे जिज्ञासू चित्रण केले आहे ते पाहून मला खूप आनंद झाला.

काश्मीरच्या बांधवांना तसेच लष्कराच्या जवानांना राखी बांधणाऱ्या त्यांच्या मुलींना पाहून साधनाला अश्रू अनावर झाले.

‘मला माझी बहीण आणि आमच्या घरी उत्सव साजरा करण्याची आठवण येते, पण पुण्यातून राखी बांधण्यासाठी आलेल्या आमच्या तरुण बहिणींना पाहून मला आनंद झाला. यामुळे मला माझ्या बहिणीने मला राखी बांधल्याची आठवण झाली.’ असे राखी बांधताना भारावून गेलेल्या एका सैनिकाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.