Pune News : कात्रज कोंढवा रस्त्यासाठी पुन्हा सल्लागार नेमण्यासाठी जाहिरात !

एमपीसी न्यूज : कात्रज – कोंढवा रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी नेमणूक करण्यात आलेल्या सल्लागार कंपनीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याने सल्लागार बदलण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नवीन सल्लागार नेमण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

काम सुरू झाल्यानंतर सल्लागाराची जाहीरात काढल्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी महापालिकेने सल्लागाराचीही नेमणुक केली आहे. रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन न झाल्याने काम कासवगतीने सुरु आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने या कामासाठी पुन्हा एकदा सल्लागार नेमण्याची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

यासंदर्भात बोलताना महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, कात्रज – कोंढवा रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी नेमणूक करण्यात आलेल्या सल्लागार कंपनीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. परिणामी संबंधीत कंपनीने काम करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे दुसरा सल्लागार नेमण्याची जाहिरात काढण्यात आली.

दरम्यान, कात्रज कोंढवा रस्त्यासाठी काम सुरु झाल्यानंतर देखरेखीसाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. यामध्ये त्याला 50 कोटीच्या कामाचा अनुभव असावा अशी अट घालण्यात आली आहे. प्रशासनाकडून टाकण्यात येणाऱ्या अटीमुळे स्पर्धा होत नाही. नोंदणी आवश्यक केल्यास नोंदणी असलेलेच लोक निविदेत सहभागी होत असल्यामुळे तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी अशा प्रकारच्या अटी टाकू नये, असे आदेशच काढले होते.

तसेच सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, पथ विभागाकडून निविदा काढताना नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. यातून एखादा विशिष्ट सल्लागार डोळ्यासमोर ठेऊन टेंडर काढल्याचा संशय येतो. मुळातच काम सुरु झाल्यानंतर महापालिकेला सल्लागाची नेमणूक करावी वाटत असेल तर महापालिकेचे बड्या पगाराचे अधिकारी काय करतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.