Pune News : परवानगी नसतानाही आंदोलन केले, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह महापौर, आणि भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासह, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक दीपक पोटे, राजेंद्र मानकर राजेश येनपुरे, हेमंत रासने, गणेश बिडकर, यांच्यासह संजय देशमुख, बापू नाईक, निलेश कदम, राजू परदेसी, पुनीत जोशी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी न घेता इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे घातक कृत्य केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. ही धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावीत याकरिता भाजपच्या कसबा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्याने घंटानाद आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी फरासखाना पोलिस ठाण्यात अर्ज केला होता. परंतु पोलिसांनी कोरोनामुळे परवानगी नाकारली होती. तरीदेखील चंद्रकांत पाटील यांच्यासह महापौर आणि भाजपच्या नगरसेवकांनी कसबा गणपती मंदिरासमोर टाळ्या वाजवून, घंटानाद करून आंदोलन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.