Pune News : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेल्या मनमानी धोरणांविरोधात आज, गुरुवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिका भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत शहरातील रस्ते खोदाईच्या संदर्भात काही निकष लागू करण्यात आले होते. त्यानुसार, पावसाळा संपल्यानंतर 15 मे पर्यंत पाणी, ड्रेनेज आणि केबल आदी कारणांसाठी रस्ते खोदाईचे काम हाती घेण्यात येत होते. 15 मे नंतर कोणत्याही प्रकारे खोदाईची कामे न करता 15 ते 31 मे दरम्यान मान्सूनपूर्व कामांची दुरुस्ती करून शहराला पावसाळ्याला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवले जात होते. परंतु, पुढील वर्षी महानगरपालिकेची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीवर डोळा ठेवून सत्ताधाऱ्यांकडून या निकषांना हरताळ फासला जात आहे.

केवळ आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी शहरात आजही तीनशे ते चारशे कोटी रुपयांच्या कामांच्या माध्यमातून लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता अशा विविध रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे. अनधिकृत केबल खोदाईसाठी परवानगी दिली जात आहे. या सर्व बाबी आक्षेपार्ह असून, त्यामुळे पुणेकर नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

विविध ठिकाणी केलेल्या खोदकामांमुळे गेल्या दहा-बारा दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. केवळ स्वत:च्या फायद्यासाठी वाहनचालक व पादचाऱ्यांना जागोजागी त्रास सहन करावा लागत आहे. ही पुणेकरांची फसवणूक असून, पुणेकरांची गैरसोय करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

तसेच, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या मुख्य सभेत महानगरपालिकेच्या सेवक व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, त्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. महापालिकेकडून राज्य सरकारलाही याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार करीत कर्मचाऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. त्याचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, मनपा विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, शहर महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी, युवक अध्यक्ष महेश हांडे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेवक वनराज आंदेकर, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, नगरसेवक वनराज आंदेकर, नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका प्रिया गदादे, नितीन कदम, काकासाहेब चव्हाण, मनाली भिलारे, विशाल मोरे, अश्विनी परेरा, अझीम गोडाखूवाला, संतोष नांगरे तसेच सर्व विधानसभा अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.