Pune News : कोरोना नियंत्रणासाठी अजित पवार यांनी पुण्यात मुक्काम ठोकावा; पुणेकरांची मागणी

मागील बैठकीत कोरोना आटोक्यात आला नाही तर, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी बजावले होते.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात रोज कोरोनाचे 2 हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. तर, 40 – 45 पेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता दर आठवड्याला बैठक न घेता पुण्यात मुक्काम ठोकण्याची मागणी जोर धरत आहे. मागील बैठकीत कोरोना आटोक्यात आला नाही तर, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी बजावले होते. त्यामुळे हे अधिकारी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना नियंत्रणाबाबत या अधिकाऱ्यांची तीच तीच उत्तरे ऐकून अजित पवारांसोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा नाराज असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. या अधिकाऱ्यांनी मनासारख्या पोस्टिंग करून घेतल्या, जम्बो हॉस्पिटल बांधून घेतले.

मात्र, या जम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार मिळण्याऐवजी ते वादग्रस्तच जास्त ठरले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतर्फे या ठिकाणी आता कारवाईचा हंटरच उगवण्यात आला आहे.

पुणे शहराची लोकसंख्या 40 लाखांच्या आसपास आहे. तब्बल 7 हजार कोटींचे बजेट महापालिकेचे आहे. मात्र, सध्या कायमस्वरूपी आरोग्यप्रमुखांविनाच कोरोनाचा सामना करीत आहे.

तर, शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेले डॉ. नितीन बिलोलीकर आणि आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे दोघेही सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत.

पुणेकरांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आता अजित पवार यांनीच धाडसी निर्णय घेण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर जिल्ह्यांतील सुमारे 40 टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

श्रीमंत लोक जाणूनबुजून पुण्यात बेडस अडकवून ठेवत असल्याने पुणेकरांना 1- 1 बेडससाठी संघर्ष करावा लागत आहे. तर, काही जणांचा बेड न मिळाल्याने मृत्यू सुद्धा झाला आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 20 हजार 692 रुग्णांपैकी 1 लाख 74 हजार 627 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 हजार 117 आहे.

कोरोनाबाधित एकूण 4 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.13 टक्के आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.