
Pune News : अजितदादा क्वारंटाईन ; ऑनलाईन बैठकांद्वारे कामांचा धडाका सुरू!

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काल रात्री अचानक क्वारंटाईन झाले. त्यामुळे महामेट्रो, पीएमआरडीए आणि पुणे महापालिकेच्या विविध विषयांवरील बैठका ऑनलाईन पार पडणार आहेत. मात्र, अजितदादा व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सर्व बैठकांना हजर राहात कामाचा धडाका सुरू ठेवणार आहेत.

कोरोना महामारीच्या काळात मुख्यमंत्र्यांसह राज्यातील सर्व मंत्र्यांनी घरातून कामकाज पाहत होते. त्यावेळी राज्यभरात दौरे करत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष बैठका घेत कामांचा सपाटा लावत होते. यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी हाताला ग्लोव्हज, तोंडाला मास्क आणि प्रत्येक कागद सॅनिटाईज करून घेत दक्षता घेतली.

गेल्या सहा महिन्यांपासून अजित पवार एकदाही घरी क्वारंटाईन झाले नाहीत. काही कारणास्तव ते घरात राहून कामकाज पाहणार आहेत. त्यामुळे त्यांना कोरोना झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या पूर परिस्थिती, कोविड आढावा आणि मेट्रोच्या कामांचा आढावा दर शुक्रवारी घेतला जातो. परंतु बुधवारी (दि.21 नोव्हेंबर) सर्व बैठका आणि कार्यक्रमांना ते व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे हजेरी लावणार असल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली.
प्रधानमंत्री घरकूल योजनेच्या ऑनलाईन सोडतीच्या कार्यक्रमाला अजितदादा ऑनलाईन हजर राहणार आहेत. त्यामुळे क्वारंटाईन काळातही दादांच्या कामाचा सपाटा सुरूच राहणार आहे.
