_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune News : कोविड रुग्णाच्या मृत्यूसंदर्भात महावितरणवरील आरोप चुकीचे

एमपीसी न्यूज – मोशी येथील कोविड रुग्ण ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे. वादळामुळे डिओ गेल्यामुळे या सोसायटीला तीन पैकी एक फेजमधून वीजपुरवठा बंद झाला होता आणि तक्रार प्राप्त होताच सुमारे 35 मिनिटात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. सोबतच या ज्येष्ठ महिलेच्या घरी इन्व्हर्टरद्वारे पर्यायी वीजपुरवठा देखील सुरळीत होता.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत माहिती अशी की, भोसरी विभाग अंतर्गत मोशी येथील आद्या राधाकृष्ण सोसायटीमध्ये एक फेजमधील वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार दि. 2 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास वाजता प्राप्त झाली. त्यानंतर 10 मिनिटातच महावितरणचे जनमित्र या सोसायटीमध्ये पोहचले व पाहणी सुरु केली. यामध्ये वादळामुळे मोठ्या फलकाचा तुकडा वीजतारांवर कोसळल्याने इनकमिंगच्या एक फेजचा ड्रॉप आऊट फ्यूज गेल्याचे दिसून आले. हा फ्यूज बसविण्यासाठी मुख्य वीजवाहिनीचा वीजपुरवठा एक मिनिटासाठी बंद ठेवण्यात आला होता व दुरुस्ती कामानंतर लगेचच या सोसायटीला पूर्ववत तीन फेजद्वारे वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. या व्यतिरिक्त मुख्य वाहिनीच्या वीजपुरवठ्यात कोणताही व्यत्यय आला नाही.

दरम्यान खंडित वीजपुरवठ्यामुळे ऑक्सीजन न मिळाल्याने कोविडबाधीत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आल्याने बुधवारी (दि. 4) वस्तुस्थितीची महावितरणकडून पाहणी करण्यात आली. ऑक्सीजनच्या सिलिंडरसाठी वीजपुरवठ्याची गरज नाही. मात्र संबंधीत ज्येष्ठ महिलेला कॉन्सन्ट्रेटरद्वारे ऑक्सीजन देण्यात येत होता. त्यासाठी घरी इन्व्हर्टरचा पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होता व रुग्ण महिलेस ऑक्सीजनचा पुरवठा देखील सुरु होता असे दिसून आले. सध्या मान्सूनपूर्व वादळी पावसाचे भोसरी व पिंपरी परिसरात दुपारनंतर तडाखे बसत आहेत. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.