Pune News : माजी विद्यार्थ्यांनी ‘हेल्प नीडी’ योजना राबवावी : प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – जगभर माजी विद्यार्थी एकत्र येऊन शिक्षण संस्था चालवतात. आपली शाळा हा समान धागा असतो. एकत्र येण्याने महत्त्वाची कामे होतात. नेटवर्किंगमुळे वैयक्तिक आणि सामुदायिक फायदा होतो. समाजातील अतिशय गरीब पण प्रचंड गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्प नीडी’ ही योजना राबविणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांनी हातभार लावावा असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या ऑनलाइन औपचारिक उद्घाटन समारंभात जावडेकर बोलत होते.

डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. खासदार गिरीश बापट, उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, टिळक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, नियोजित माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देवधर यांनी मनोगत व्यक्त केले.

खासदार बापट म्हणाले, ‘शाळा हे आई वडिलांइतकेच महत्त्वाचे केंद्र आहे ज्याबद्दल बोलता येत नाही. मात्र मुलांची जडणडण करण्याचे काम शाळा आणि शिक्षक करीत असतात. आपण समाजाचे देणे लागतो हा संस्कार शाळेने दिला.’

डॉ. कुंटे म्हणाले, ‘डीईएसच्या वतीने समाजाची स्थिती बदलू शकतील असे स्मार्ट विद्यार्थी घडविण्याची गती वाढविण्यात येणार आहे. तशी क्षमता असणारे शिक्षक घडविणे आणि व्यवसायभिमुख शिक्षणावर भर देणार आहोत.’

सोसायटीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, प्रबंधक डॉ. सविता केळकर आणि पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यांनी परिचय, मुख्याध्यापक दिलीप रावडे यांनी मानपत्र वाचन, मोहन शेटे यांनी सूत्रसंचालन आणि शाला समितीचे अध्यक्ष अड अशोक पलांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

रमणबाग शाळेतील विविध विकासकामांसाठी खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी जावडेकर यांनी जाहीर केला. उद्योजक प्रमोद चौधरी यांनी 75 लाख रुपयांचा निधी जाहीर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.